अमेरिकेत तब्बल १ लाख जणांचा जाणार बळी? ‘त्या’ एका ऑर्डरनं चिंता वाढली

body-bags

वॉशिंग्टन: कोरोनाचा सर्वाधिक मोठा फटका अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे. अमेरिकन प्रशासनानंदेखील याची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं संरक्षण विभागाकडे १ लाख बॉडी बॅग्स मागितल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे ६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं १ लाख बॉडी बॅग्स मागितल्याची माहिती पेंटॉगॉननं गुरुवारी दिली. अमेरिकन प्रशासनानं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, रुग्णांवरील उपचारांसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असली तरीही मृतांचा आकडा १ लाख ते २ लाख ४० हजारांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता व्हाईट हाऊसमधील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं तयार सुरू केली आहे.

फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीनं (फेमा) केलेल्या विनंतीनंतर पेंटागॉनच्या डिफेन्स लॉजिस्टिक एजन्सीनं हालचाली सुरू केल्या आहेत. ‘संघराज्यांमधील आरोग्य विभागांच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं १ लाख बॉडी बॅग्सची मागणी केली आहे. त्यानुसार आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे,’ अशी माहिती पेंटागॉनचे प्रवक्ते लेफ्टनंट माईक अँड्रूज यांनी दिली.

अमेरिकेत, विशेषत: न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा अतिशय वेगानं फैलाव झाला आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे अतिशय वाईट असू शकतात, असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारीच म्हटलं होतं. पुढील काही दिवस अतिशय अवघड असणार आहेत. प्रत्येक अमेरिकन नागरिकानं त्यासाठी तयार राहावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं.

सध्या जगातील कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ३० हजार १८१ इतकी आहेत. यातील जवळपास २५ टक्के रुग्ण रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ४५ हजार ३८० इतकी असून मृतांचा आकडा ६ हजार ९५ वर पोहोचला आहे. काल एकाच दिवसात अमेरिकेत ९०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.