नागपूर : कोरोना विषाणू थेट फुफ्फुसांवर आघात करतो. हा विषाणू फुफ्फुसात घुसल्यानंतर गुणाकार पद्धतीने पसरतो. यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. वैद्यकीय भाषेत याला ‘शॉर्टनेस ऑफ ब्रेथ’ असे संबोधले जाते. श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी अवघ्या दोन-तीन दिवसांत खालावते. यामुळे रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेन्टिलेटरची गरज पडते. उपराजधानीतील मेडिकल, मेयोत वयाची पन्नाशी ओलांडल्या ७० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘हायपॉक्सिया’ म्हणतात.
सामान्यपणे व्यक्तीच्या शरीरात ९५ ते ९९ टक्के ऑक्सिजन असतो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी झालं तर श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. येथील एका रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले. मात्र, श्वास घेण्यास त्रास होत नव्हता. कोरोनाचे हे दुर्मिळ लक्षण असून ते घातक ठरू शकते. चोरपावलाने हळूहळू शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. कळतही नाही मात्र याचे परिणाम गंभीर होतात.
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. रक्तातून हा ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो. हायपॉक्सिया म्हणजे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये हे सामान्यपणे दिसून येते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे जाणवताच ‘पल्स ऑक्सिमीटर’च्या मदतीने आपण सहजतेने शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासू शकतो, असे मेडिकल-सुपर स्पेशालिटीचे श्वसनरोग प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले.
ऑक्सिजन कमी झाल्यास
- श्वास घेण्याची गती वाढते
- मनात गोंधळाची परिस्थिती निर्माण होते
- हृदयाचे ठोसे अचानक वाढल्याचे जाणवते
- शरीरावर घाम येण्याचे प्रमाण वाढते
वारंवार ऑक्सिजनची पातळी तपासावी
शरीरातील अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम रक्ताद्वारे होते. शरीरातील पेशींना हवे असलेल्या ऑक्सिजनचा प्रवाह रक्ताद्वारे पुरेशा प्रमाणात पोहोचवला जात नाही. अशावेळी शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होते. लक्षणे कळत नसल्याने पुढे गंभीर परिस्थिती निर्माण होते. कोरोनाच्या संसर्गामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. कोरोनाची बाधा झाल्यास वारंवार ऑक्सिजनची पातळी तपासावी. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.