आजतक चे अँकर रोहित सरदाना यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. त्यांच्यावर दिल्लीत करोनावर उपचार सुरू होते. पण याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. टीव्ही जगतात रोहित सरदाना हे एक मोठं नाव होतं. त्यांनी आज तकसोबतच या अगोदर झी न्यूजसोबत प्राईम टाईम अँकर म्हणून काम केलं आहे. आज तकवर त्यांचा दंगल हा कार्यक्रम लोकप्रिय होता.
वार्तांकन करत असताना आतापर्यंत अनेक पत्रकारांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशात गेल्या एक वर्षात रोहित सरदाना यांच्यासह एकूण ६५ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. यातील ३२ पत्रकार फक्त २०२१ मधील चार महिन्यातच देशाने गमावले आहेत. उत्तर प्रदेश आणि तेलंगणातील सर्वाधिक पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही गेल्या वर्षी पुण्यात मृत्यू झाला होता.
याशिवाय महाराष्ट्रातही पत्रकारांचा करोनाने मृत्यू होत आहे. उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार विजय बेदमुथा ( वय ६७ ) यांचे हैद्राबाद येथे कोरोनाने काल निधन झाले. आठच दिवसापूर्वी त्यांचे मोठे बंधू पत्रकार मोतीचंद बेदमुथा ( वय ६९ ) यांचे कोरोनाने निधन झाले होते.