वसई: रहिवाशी इमारतीमधील ATM लुटण्याचा चोराचा डाव एका ४५ वर्षीय सर्तक महिलेने उधळून लावला. वसईमध्ये ही घटना घडली आहे. सदर महिला तिथे एका नातेवाईकाच्या घरी दु:खद निधन झाल्याने भेटण्यासाठी म्हणून गेली होती. वसई पूर्वेला फादरवाडीमध्ये सुकन्या पवार यांचे नातेवाईक राहतात. अलीकडेच त्यांचे निधन झाले. सुकन्या पवार त्यांना भेटण्यासाठी म्हणून तिथे गेल्या होत्या. सुकन्या घरामध्ये धार्मिक पुस्तक वाचत होत्या.
त्यावेळी दुपारी २.३० च्या सुमारस इमारतीच्या खाली असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या ATM सेंटरमधून त्यांना आवाज ऐकू आला. त्या जिने उतरुन खाली आल्या. त्यावेळी एटीएमचे शटर खाली ओढून घेतल्याचे त्यांना आढळले. त्या बंद शटरच्या जवळ गेल्या. त्यावेळी आतमध्ये आदळ-आपट सुरु असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या लगेच वरती आल्या. त्यांनी लॉक घेतले व खाली जाऊन त्या शटरला टाळे लावले. त्यानंतर त्यांनी लगेच इमारतीतील अन्य रहिवाशांना या प्रकाराची कल्पना दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
तिथे जमलेल्या लोकांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी टाळे उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी आरोपीच्या हातात हातोडा होता. आरोपीने पोलिसांना हातोडी दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी लगेचच त्या आरोपीला पकडले.
सलीम मनसुरी असे आरोपीचे नाव असून तो बोरिवलीचा रहिवाशी आहे. मनसुरीने एटीएम मशीन फोडले होते. पण त्यातला मशीनच्या आतमधील १० लाखाची कॅश लांबवता आली नाही. वाळीव पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. इमारतीमधील अन्य रहिवाशींनी सुद्धा ते आवाज ऐकले पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण सुकन्या पवार या महिलेच्या सर्तकतेमुळे चोरीचा मोठा डाव उधळला आहे.