नागपूर – चिखल मातीने भरलेल्या पाय धुण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या तीन पैकी दोन शाळकरी मुलांना एका तरुणाने वाचवले. मात्र, एकाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयस्वाल शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. उमदे उल्ला सलीम खान (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. तो सुमीतनगरजवळ राहत होता.
आठवीचा विद्यार्थी असलेला उमदे त्याच्या दोन मित्रांसह वाठोड्यातील जयस्वाल शाळेच्या बाजुला असलेल्या शिवारात फिरायला गेला होता. तिकडे या तिघांनी मोबाईलवर फोटो काढून घेतले. सायंकाळी ४.३० च्या सुमारास लिंबाच्या बागेजवळ गेले. तेथे त्यांनी फोटो काढून घेतले. बाजुलाच एक शेततळे आहे. त्याला कुंपनही घातले आहे. चिखलांनी पाय माखले असल्यामुळे हे तिघे शेततळ्यात उतरले. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज नव्हता. त्यामुळे ते पाण्यात बुडू लागले. बाजुलाच एक तरुण होता. त्याला हे दिसल्याने तो त्यांच्याकडे धावला. त्याने दोरी फेकून दोघांना पाण्याबाहेर काढले. उमदे मात्र पाण्यात बुडून मृत झाला. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच जयस्वाल शाळेजवळची मंडळी तिकडे धावली. त्यांनी वाठोडा पोलिसांना माहिती कळविली. वाठोड्याच्या ठाणेदार आशालता खापरे यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे धाव घेतली. अग्निशमन दलालाही बोलवून घेतले. पावसामुळे चिखल असल्याने वाहन घटनास्थळापर्यंत जात नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना तेथे पोहचण्यास उशिर झाला. त्यांनी उमदेला पाण्यातून बाहेर काढले. सलीम खान मुस्ताक खान (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
परिसरात हळहळ
या घटनेचे वृत्त सुमीतनगरात पसरताच रहिवाशी हळहळ करू लागले. उमदेच्या कुटुंबात आईवडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असल्याचे पोलीस सांगतात. त्याच्या कुटुंबीयांना या घटनेमुळे तीव्र मानसिक धक्का बसला आहे.