नागपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना जरीपटका ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. आरोपींबाबत कुठलाही धागा गवसला नसताना केवळ चार तासात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना अटक केली. शमशाद उर्फ सैम रफीक अन्सारी (21), रा. गिट्टीखदान आणि बबलू उर्फ बब्बू मोहन कतवटे (21) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पीडित बालिका 14 वर्षांची आहे. पाच दिवसांपूर्वी म्हणजे दिवाळीच्या दिवशी (वसुबारस दिवाळीचा पहिला उत्सव) दुपारच्या सुमारास पीडितेला तिची मैत्रिण मार्टिननगरमध्ये भेटणार होती. बराच वेळपर्यंत रस्त्यावर प्रतीक्षा केल्यानंतरही मैत्रीण आलीच नाही. त्यामुळे कंटाळून पीडिता घरी जाण्यासाठी निघाली.
दरम्यान, शमशाद आणि बबलू हे दोघेही उत्तर नागपुरातील मित्राला भेटून त्याच मार्गाने परतत होते. मोटारसायलकने जात असताना ते पीडितेजवळ थांबले. काहीच कारण नसताना तिला आपल्यासोबत मोटारसायकलवर येण्याबाबत विचारले. पीडितेने नकार देताच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून त्यांना गाडी दामटली. रस्त्यात चायनीजच्या दुकानातून नुडल्स खरेदी केले. यानंतर ते तिला घेऊन गोरेवाड्याच्या जंगलात आले. येथे दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला आणि सायंकाळच्या सुमारास तिला तिच्या घराजवळ आणून सोडले. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने घरी पोहोचताच स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतले. जेवण न करताच ती झोपी गेली. दुसर्या दिवशी आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सार्या कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली. कुटुंबीयांनी तिला घेऊन जरीपटका ठाणे गाठले. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी अपहरण आणि सामुहिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली. न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजवरून शोध
पीडिता दोन्ही आरोपींना ओळखत नव्हती. पोलिसांनी रस्त्यावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासले. त्यांना दोन्ही आरोपी मोटारसायकलवर पीडितेला घेऊन जाताना दिसले. मोटारसायकलचा नंबर आणि आरोपींच्या फोटोच्या माध्यमातून दोघांनाही शोधण्यात आले. चौकशीत दोघांनीही अत्याचार केल्याचे कबूल केले.