गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये राहणाऱ्या भारतीय संघाकडून आजपासून (शनिवार) सुरू होणाऱ्या १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. राष्ट्रकुलपेक्षा आशियाई स्पर्धेत, स्पर्धा अधिक तीव्र असल्याने भारतीय खेळाडूंची कसोटी लागणार आहे. या स्पर्धेत भारताने युवा आणि अनुभवी खेळाडू मैदानात उतरविले आहेत.
खेळाडूंच्या निवडीवरून झालेले वाद, तक्रारी, कोर्टाचा निर्णय, पथकाचा आकार यावरून अखेरपर्यंत असलेला ‘सस्पेन्स’ मागे टाकून भारताचे खेळाडू आणि अधिकारी मिळून ८०४ जण जकार्तामध्ये दाखल होतील. मात्र, एकदा मैदानात उतरल्यावर वाद विसरून सहभागी सर्व खेळाडूंचे लक्ष पदकावर असेल.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यात भारतीय पथकाच्या ध्वजधारकाचा मान युवा भाला फेकपटू नीरज चोप्राला मिळाला आहे. यानंतर सुरू होईल, आशियातील पॉवरहाउस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीन, जपान, कोरियाच्या खेळाडूंशी दोन हात करण्याची स्पर्धा. कझाकस्तान, इराण, थायलंड यांनीही २०१४च्या इंचॉन आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंना मागे टाकले होते. भारतीय पथकात १६ वर्षांच्या हरियाणाच्या मनू भाकेरपासून (नेमबाज) अनुभवी सुशीलकुमारपर्यंत (कुस्ती) खेळाडूंचा समावेश आहे.
अधिक वाचा : टेनिस स्टार लिएंडर पेस एशियाई खेलों मे नही लेंगे हिस्सा