सायना नेहवाल, पीव्ही सिंधू आणि बी साईप्रणीत यांनी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; पण या सगळ्यात खास ठरला तो माजी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपपदक विजेती सायना नेहवालचा विजय. तिने कारकिर्दीत आठव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात यश मिळवले.
या प्रतिष्ठेच्या अन् मानाच्या स्पर्धेत आठवेळा उपांत्यपूर्व फेरी गाठणारी सायना जागतिक बॅडमिंटनमधील एकेरीची पहिलीच बॅडमिंटनपटू ठरली आहे. या सगळ्या आनंदाच्या बातम्यांमध्ये जगज्जेतेपदाच्या शर्यतीत धरला जाणाऱ्या श्रीकांतचा विजय मात्र निराश करणारा ठरला. जागतिक रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला तो जागतिक रँकिंगमध्ये ३९व्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाच्या डॅरेन लीव यांनी. त्याने श्रीकांतवर २१-१८, २१-१८ अशी मात केली.
२८ वर्षांच्या सायनाने विक्रमी विजय नोंदवला तो माजी जगज्जेत्या बॅडमिंटनपटूला हरवून. तिने थायलंडच्या रॅटचॅनॉक इन्टॅननवर २१-१६, २१-१९ अशी मात केली. पुढील फेरीत सायना मुकाबला होईल तो माजी जगज्जेत्या कॅरोलिना मरिनशी. तर रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची मानकरी ठरलेल्या भारताच्या पीव्ही सिंधूने कोरियाच्या सुंग जी ह्यूनवर २१-१०, २१-१८ अशी मात केली. पुढील फेरीत सिंधूची गाठ पडले ती गतविजेती नोझोमी ओकुहाराशी. गेल्यावर्षी या वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल सिंधू आणि ओकुहारा यांच्यामध्येच पार पडली होती अन् तेव्हा ओकुहाराने विजय मिळवला होता.
भारताच्या बी साईप्रणीतने पुरुष एकेरीतून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने डेन्मार्कच्या हॅन्स ख्रिस्तियन सोलबर्ग व्हितिंगघसवर २१-१३, २१-११ असा विजय मिळवला. सायना, सिंधू यांच्याप्रमाणे साईप्रणीतची पुढील फेरीदेखील आव्हानात्मक ठरणार आहे; कारण तिथे त्याचा मुकाबला होईल तो जपानच्या केन्टो मोमाताशी. गुरुवारी पराभूत झालेला श्रीकांत, गतजगज्जेता व्हिक्टर अॅक्सलसन यांच्यासह मोमोता याला जेतेपदासाठी फेव्हिरट समजले जाते आहे.
अधिक वाचा : Four girls from Maharashtra to represent India in SAFF U-15 Women’s Championship