मुंबई : मोठ्या आकाराचे टीव्ही, वातानुकूलित यंत्रणा आणि सीमेंटच्या किंमती येत्या काही दिवसांत कमी होतील, असे संकेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. जीएसटीच्या माध्यमातून होणाऱ्या करसंकलनामध्ये अपेक्षित वाढ झाल्यानंतर या वस्तू जीएसटीच्या (वस्तू व सेवाकर) सर्वोच्च म्हणजे २८ टक्क्यांच्या स्तरामध्ये असून त्यांना या स्तरातून बाद करण्यात येतील, अशी शक्यता जेटली यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, ‘देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक गृहोपयोगी वस्तूंवर व उपकरणांवर तब्बल ३१ टक्के कर आकारला जात होता. या प्रकाराला आपण काँग्रेस लीगसी टॅक्स असे म्हणू शकतो. मात्र जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर वर्षभरात ३८४ वस्तूंवरील कर कमी झाला आहे. २८ टक्क्यांच्या स्तरांतील अनेक वस्तूंवरील कर टप्प्याटप्प्याने कमी केले जात आहेत. यात उरलेल्या वस्तूंमध्ये चैनीच्या वस्तू तसेच अहितकारी वस्तूंचे (सिन गूड्स) प्रमाण अधिक आहे. करसंकलनात वाढ झाल्यानंतर यातील मोठ्या आकाराचे टीव्ही, वातानुकूलित यंत्रणा आणि सीमेंट या वस्तूंचा १८ टक्क्यांच्या स्तरात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या किंमती कमी होतील.’
जीएसटीच्या रचनेत सध्या ०, ५,१२,१८,२८ असे पाच प्रकारचे कर आहेत. २८ टक्क्यांच्या सर्वोच्च स्तरात चैनीच्या वस्तू तसेच सिगारेट, तंबाखू याचा समावेश आहे. २८ टक्क्यांच्या स्तरातील अनेक वस्तूंवरील कर सरकारने यापूर्वीच कमी केले आहेत.
जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर राज्य सरकारना महसुली फटका बसू नये या हेतूने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना दरवर्षी १४ टक्के महसूलवाढीची हमी दिली आहे. यामुळे तसेच, अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने केंद्र सरकारवर ७० हजार कोटी रुपयांचा बोजा पडला आहे, असेही जेटली यांनी नमूद केले.
हेही वाचा : Sukanya Samriddhi Yojana : Modi govt reduces minimum deposits to Rs 250