नागपूर : उपराजधानीत गुरुवारी प्रथमच मेयोतील मेंदूमृत रुग्णाच्या फुफ्फुसाचे न्यू ईरा रुग्णालयातील एका रुग्णावर तर दोन मूत्रपिंडाचे इतर दोन खासगी रुग्णालयांतील रुग्णांमध्ये यशस्वी प्रत्यारोपण करून तिघांना जीवदान मिळाले. दोन बुब्बुळ नेत्रपेढीला मिळाले असून त्यातून दोघांना दृष्टी मिळाली.
राम काकुमल खिलनानी (४६) रा. जरीपटका, नागपूर असे अवयवदात्याचे नाव आहे. किराणा व्यवसायिक राम यांना पत्नी सिमरनसह हार्दिक (६) आणि भूमिका (१२) ही मुले आहेत. राम यांचा २० जुलैला गिट्टीखदान येथे अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी मेयोत दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मंगळवारी त्यांचा मेंदूमृत असल्याचे निदान झाले. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आणि डॉ. वैशाली शेलगावकर यांनी खिलनानी यांच्या पत्नी सिमरन यांना अवयवदानासाठी समुपदेशन केले. त्यांनी तयारी दर्शवताच विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवि वानखेडे यांनी गरजूंचा शोध सुरू केला.
न्यू ईरा येथे या रुग्णाच्या गुणसूत्राशी जुडणारा एक रुग्ण यकृताच्या प्रतिक्षेत तर ऑरेंजसिटी आणि केअर रुग्णालयात मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील रुग्ण असल्याचे निदर्शनात आले. तातडीने ग्रीन कॅरिडोरच्या मदतीने अवयव पोहोचवून संबंधित रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले गेले. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे या सर्व रुग्णांना जीवदान मिळाले.
दरम्यान, हे अवयव विविध रुग्णालयांत पोहोचवण्यासाठी शहरात तीन ग्रीन कॅरिडोर केले गेले होते. पहिल्या कॅरिडोरच्या मदतीने २.३० मिनटांत मेयो ते न्यू ईरा रुग्णालयात यकृत पोहोचले.
मेयोतून केअर रुग्णालयात आणि येथून ऑरेंजसिटी रुग्णालयातही प्रत्येकी तीन मिनिटांमध्ये अवयव पोहोचवले गेले. त्यासाठी तिन्ही रुग्णालयातीन वैद्यकीय पथक मेयोत गेले होते.
न्यू ईरात आठवे यकृत प्रत्यारोपण
मध्य भारतात यकृत प्रत्यारोपणासाठी न्यू ईरा आणि इतर एक अशा दोनच ठिकाणी प्रत्यारोपण केंद्र मंजूर आहे. न्यू ईरामध्ये अल्प कालावधीत आजपर्यंत नऊ यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. गुरुवारच्या यशस्वी प्रत्यारोपणासाठी न्यू ईराच्या यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. आनंद संचेती, डॉ. अग्रवाल यांच्यासह न्यू ईराच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
अधिक वाचा : भारतात सापडला जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट !