बीएमडब्ल्यू या लक्झरी कार उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीनं आता भारतामधल्या आकर्षक अशा मोटरबाईक क्षेत्रातही प्रवेश केला आहे. या कंपनीच्या दोन बहुप्रतिक्षित G 310 R आणि बीएमडब्लू G 310 GS या बाईक भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. २.९९ लाखापासून या बाईकची किंमत सुरु होते. आकारमानाचा विचार करता G 310 R आणि G 310 GS या दोन्ही लहान बाईक्स आहेत. या दोन बाईक्सपैकी G 310 GS ही बाईक तुम्हाला साहसी मोहिमेमध्ये उत्तम साथ देऊ शकते.
कर्नाटकातील होसूर येथील टीव्हीएसच्या प्लांटमध्ये या दोन्ही बाईक्सचे उत्पादन करण्यात आले आहे. २०१६ साली पहिल्यांदा ऑटो एक्सपोमध्ये बीएमडब्लू G 310 R बाईक प्रदर्शित करण्यात आली. त्यानंतर २०१८ च्या ऑटो एक्सपोमध्ये या दोन्ही बाईक प्रदर्शित करण्यात आल्या. त्यावेळी यावर्षात दोन्ही बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार या बाईक भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.
या दोन्ही बाईक्समध्ये ३१३ सीसी सिंगल सिलिंडर लिक्वीड कूल इंजिन वापरण्यात आले आहे. या बाईकचा टॉर्क ९५०० आरपीएम आहे. बीएमडब्लू चा G 310 R टॉप स्पीड ताशी १४५ किलोमीटर आहे. त्याचेच भावंड असलेले G 310 GS ताशी वेग १४३ किलोमीटर वेग आहे. बीएमडब्लू G 310 R ची किंमत २ लाख ९९ हजार आहे तर GS ची किंमत ३ लाख ४९ हजार आहे.
भारतीय बाजारपेठेत मोटरबाईक्सची मागणी वेगाने वाढत असून होंडा, सुझकी, बजाज या कंपन्यांसोबतच केटीएम, हार्ले, एनफिल्ड बुलेट आदी कंपन्यांच्या हाय एंड गाड्याही तेजीत आहेत. या गाड्यांना तरूणांकडून मोठी मागणी असून या स्पर्धेमध्ये आता बीएमडब्ल्यू ही उतरली असून ग्राहकांना निवडीची संधी मिळणार आहे.
अधिक वाचा : जगातल्या सर्वात मोठ्या सॅमसंग मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन