नागपुर :- सामान्य आणि प्रशासन विभागाअंतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
या मंत्रालयाला अर्थ आणि सांख्यिकी विभाग आणि एमआरएसएससी विभाग जोडण्यावर निर्णय घेऊ, असेही ते यावेळी म्हणाले.
राज्यात सध्या आयटीचा स्वतंत्र विभाग नाही, त्यामुळे त्याची सर्व काम ही सध्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या अंतर्गत चालविली जातात. मात्र, आता त्यासाठी एक स्वतंत्र विभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आयटी विभागाचेच काम करणाऱ्या अर्थ आणि सांख्यिकी विभागातील काही भाग आणि त्यासोबतच एमआरएसएससी विभाग या नवीन आयटी विभागाला जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.
राज्यात स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान मंत्रालय निर्माण करण्याबाबत शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर गोऱ्हे म्हणाल्या की, इंटरनेटचा चुकीचा वापर करून अर्निंबंध वापर सुरू आहे. यावर सरकार कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, या अर्निंबंधासाठी अटक करण्याची तरतूद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे.
यासंदर्भातील अटक करण्यासाठी केंद्र सरकार कायद्यात तरतूद करण्याचा विचार करत आहे, महाराष्ट्र सरकारने तशी मागणीही केंद्र सरकारकड़े केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
अधिक वाचा : मनपाच्या परवानगीशिवाय यापुढे कुठलेही खोदकाम नाही! : आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बजावले