नागपूर :- सध्याच्या काळात दुर्लक्षित असलेल्या खेळांच्या महापौर चषक स्पर्धेचे आयोजन नागपूर महानगरपालिका (मनपा) करणार असल्याची घोषणा क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी केली.
गुरूवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित क्रीडा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, समिती उपसभापती प्रमोद तभाने, समिती सदस्या सरला नायक, विरंका भिवगडे, दर्शनी धवड, साक्षी राऊत, उपायुक्त रवींद्र देवतळे, क्रीडा अधिकारी हर्षल पिवरखेडकर, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, जितेंद्र गायकवाड, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना नागेश सहारे म्हणाले, सध्या लोप पावत असलेल्या खेळांना महत्त्व देण्यासाठी मनपाचा क्रीडा विभाग पुढाकार घेत आहे. यामध्ये आटापाट्या, धनुर्विद्या, महिला फुटबॉल, रायफल शुटींग, कॅरम, बुद्धीबळ खेळांचा समावेश आहे.
‘महापौर चषक’अंतर्गत या स्पर्धांचे आयोजन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी केली. यापूर्वी कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती, सायकल पोलो यासारख्या खेळांचे आयोजन महापौर चषक अंतर्गत करण्यात आलेले होते. या स्पर्धांचाही समावेश यात राहणार असल्याची माहिती सभापती नागेश सहारे यांनी दिली.
मनपा क्षेत्रात असलेल्या सर्व शाळांच्या आंतर शालेय स्पर्धांचे आयोजन मनपाच्यावतीने कऱण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा अधिकारी हर्षल पिवरखेडकर यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत मागील वर्षी या आयोजनात जे अधिकारी होते, त्यांची पुढील महिन्यात बैठक बोलविण्याचे आदेश क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी दिले.
शहरातील कलावंतांना वाव मिळावा याकरिता मनपाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये एकांकिका स्पर्धा, महानाट्य स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन मनपाच्या वतीने करण्यात येणार आहे. मनपाच्या शाळांकरिता क्रीडा धोरण ठरविण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली.
अधिक वाचा : सिडको जमिन घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – विरोधकांची मागणी