नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या सामर्थ्याला धक्का देणारी आज (ता.०८) घटना घडली आहे. देशाचे पहिले आणि सध्याचे तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नीचाही अंत झाला आहे. या दोघांसह ११ जणांचा मृत्यू झाला.
तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान कुन्नूर येथे हा अपघात झाला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत अपघातग्रस्त हवाई दलाच्या Mi17-V5 या हेलिकॉप्टरमध्ये होते.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये एकूण नऊ जण होते.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र कुमार, एल/एनके विवेक कुमार, एल/एनके बी साई तेजा, हवालदार सतपाल हे हेलिकॉप्टरमध्ये होते.
सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी एका कार्यक्रमात सहभागी होऊन दिल्लीला परतत होते. त्यानंतर हवाई दलाचे Mi17-V5 हेलिकॉप्टर निलगिरीच्या जंगलात कोसळले.
कॅमल वेलिंग्टन, ऊटी येथे त्यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथे सीडीएस जनरल बिपीन रावत व्याख्यान देऊन परतत असताना अपघात झाला. कॅमल वेलिंग्टनमध्ये सशस्त्र दलाचे महाविद्यालय आहे.
बिपिन रावत यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद स्वीकारले. याआधी ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. रावत यांनी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले. बिपिन रावत यांना लष्करातील अत्युच्च कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक तसेच विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
जनरल बिपीन रावत यांचा जन्म उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील चौहान राजपूत कुटुंबात १९६३ साली झाला. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल लक्ष्मण सिंह रावत होते, जे सैन्यातून या पदावरून निवृत्त झाले. रावत यांनी 1978 मध्ये 11 व्या गोरखा रायफलच्या पाचव्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
रावत यांनी डेहराडूनमधील कॅंब्रियन हॉल स्कूल, शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूल आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे शिक्षण घेतले, जिथे त्यांनी ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ प्राप्त केली. ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि फोर्ट लीव्हनवर्थ, यूएसए येथील हायर कमांड कोर्सचे पदवीधर आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून डिफेन्स स्टडीज, डिप्लोमा इन मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन कॉम्प्युटर स्टडीज देखील केले आहे.
बिपिन रावत यांचा प्रवास
- बिपिन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली.
- आयएमए डेहराडून येथे त्यांना ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ प्रदान करण्यात आला.
- देवी अहिल्या विद्यापीठातून संरक्षण आणि व्यवस्थापन अभ्यासात एम फिल पदवी.
- 2011 मध्ये चौधरी चरण सिंग विद्यापीठातून मिलिटरी मीडिया स्टडीजमध्ये पीएचडी.
- तसेच मद्रास विद्यापीठातून स्ट्रॅटेजिक आणि डिफेन्स स्टडीजमध्ये एम.फिल.
- राजपूत कुटुंबात जन्मलेल्या रावत यांच्या अनेक पिढ्या लष्करात.
- जानेवारी 1979 मध्ये मिझोराममध्ये सैन्यात त्यांना पहिली नियुक्ती मिळाली.
- नेफा परिसरात तैनात असताना त्यांनी बटालियनचे नेतृत्व केले.
- त्यांनी काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेचे नेतृत्वही केले.
- त्यांनी 01 सप्टेंबर 2016 रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
- 31 डिसेंबर 2016 रोजी लष्करप्रमुख पद
- बिपिन रावत यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद स्वीकारले.