मध्य प्रदेश: काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये लग्नाच्या नावावर महिलांनी फसवणूक केलेल्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या भिण्ड कोतवाली परिसरातील बैरागपुरा येथील एक नवरी मधुचंद्राच्या रात्रीच घरातून पळून गेली. मनोज सोनी नावाच्या तरूणाने एका व्यक्तीच्या माध्यमातून ३५ हजार रूपये देऊन एक मुलगी खरेदी केली होती. या मुलीसोबत त्याने घरातच लग्न केलं. मधुचंद्राच्या रात्री पोट दुखत असल्याचं कारण देत नवरी फरार झाली.
आता नवरदेव कुणाला काही सांगू शकत नाहीये. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या सर्व भावांनी लग्ने केली आणि आपला संसार थाटला. अशात मनोजनेही आपला संसार थाटण्यासाठी ओळखीतील एका व्यक्तीच्या मदतीने ३५ हजारात एक मुलगी खरेदी केली. ४ मे रोजी घरातच त्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. पुजाऱ्यासमोर दोघांनी सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली. मित्रांनी मनोजच्या मधुचंद्रासाठी खोलीही सजवली. पण सकाळी अचानक नवरी गायब झाल्याने नवरदेवासोबत त्याचे मित्रही नाराज झाले.
असे सांगितले जात आहे की, रात्री साधारण ११ वाजता मनोज आपल्या रूममध्ये गेला. तेव्हा त्याला त्याची नवी नवरी म्हणाली की, तिच्या पोटात दुखत आहे. मनोजला वाटलं की, गरमीमुळे पोट दुखत असेल तर त्याने तिला जरा चालायला सांगितलं. साधारण एक तासानंतर पत्नी म्हणाल की, तिला अजूनही बरं वाटत नाहीये. काहीतरी औषध घेऊन या. यानंतर मनोज लगेच दुकानात औषध आणायला गेला. जेव्हा तो परतला तेव्हा त्याची पत्नी रूममधून गायब होती. आता शरमेने तो फसवणूक झाल्याची तक्रारही करू शकत नाहीये. त्याला अजूनही आशा आहे की, त्याची पत्नी कुठेही गेली नाही ती परत येईल.