फेब्रुवारीत पेट्रोल डिझेलच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर जवळपास 24 दिवस इंधनाचे दर होते. अखेर बुधवारी पेट्रोलच्या दरात 18 पैशांची तर डिझेलच्या दरात 17 पैशांची कपात करण्यात आली होती. ही कपात सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्यानं गुरुवारीसुद्धा तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत. सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कपात करून दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचंही म्हटलं जात आहे.
युरोपातील अनेक देशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. सातत्याने होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे काही देशांनी लॉकडाऊनही लागू केलं आहे. या परिस्थितीत तेलाच्या मागणीत कपात केली जाईल. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये आठवड्याभरात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. बुधवारी कच्चा तेलाचे दर 4 टक्क्यांनी घसरले. वेस्ट टेक्ससमध्ये क्रूड ऑइलचा दर 58.47 डॉलर प्रति बॅरल इतका झाला तर ब्रेंट क्रूड ऑइल 61.41 डॉलर इतक्या दराने विक्री होत आहे.
गुरुवारी पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 20 पैशांनी स्वस्त झाले. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दर कपातीमुळे पेट्रोल 39 पैसे तर डिझेल 37 पैसे स्वस्त झाले. दिल्लीत पेट्रोलचा दर 90 रुपये 87 पैसे प्रति लिटर इतका आहे. तर डिझेलते दर 81 रुपये 10 पेसे इतके आहेत. मुंबईत पेट्रोल 97 रुपये 19 पैसे तर डिझेल 88 रुपये 20 पैसे प्रति लिटर इतक्या दरात विकले जात आहे. चेन्नईत गुरुवारी पेट्रोल डिझेलचे दर अनुक्रमे 92 रुपये 77 पैसे आणि 86 रुपये 10 पैसे असे होते. कोलकात्यात पेट्रोल 90 रुपये 98 पैसे तर डिझेल 83 रुपये 98 पैसे प्रति लिटर आहे. तर देशात सर्वाधिक दराने डिझेलची विक्री भोपाळमध्ये होत आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा दर 98 रुपये 81 पैसे तर डिझेलचा दर 89 रुपये 37 पैसे इतका आहे.
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये दररोज सकाळी 6 वाजता बदल होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि इतर करांमुळे दुप्पट वाढ होते. परदेशी चलनाची किंमत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमती यावर ठरते. यानुसारच पेट्रोल डिझेलचा दर दररोज बदलत असतो.