नागपूर : कोव्हिडग्रस्त तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी तरुणीच्या नातेवाईकांनी वर्धमाननगर येथील रेडियन हॉस्पिटल येथे गोंधळ घालून डॉक्टरला शिवीगाळ करीत सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. त्याचप्रमाणे तरुणीचा मृतदेहा नेण्याचा प्रयत्न केला. कोव्हिडमुळे एका 23 वर्षीय तरुणीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला रेडियन हॉस्पिटल येथे भरती केले होते.
तरुणीची प्रकृती लक्षात घेता 12 मार्च रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास तिला अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला होता. उपचारासाठी 1 लाख 753 रुपये बिल झाले होते. त्यापैकी 50 हजार रुपये नातेवाईकांनी भरले होते. उर्वरित 50 हजार 753 भरायचे होते. तरुणीचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी उर्वरित पैसे भरण्यास नकार दिला. ललीता कापगते, तरुणीचा काका, अतुल अन्नाजी सोमकुंवर, पिरदुला अन्नाजी सोमकुंवर, पोर्णिमा पाटील यांनी ‘तुम्ही बरोबर उपचार केला नाही. त्यामुळे आमचा पेशंट मृत झाला’ असे बोलून डॉ. क्रिष्णा बापूराव बोपचे (28) यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्याचप्रमाणे ललीता आणि तरुणीच्या काकाने 20 ते 25 लोकांना हॉस्टिपलमध्ये बोलवून घेतले. सुरक्षा रक्षक देवाशंकर शाहू यांनी नातेवाईकांना बाहेरच रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याला मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे गेटचे कुलूप तोडून मनपाच्या शववाहिकेतून कोव्हिडग्रस्त तरुणीचा मृतदेह नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी डॉ. बोपचे यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.