नागपूर : राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा बंद करून महानगरपालिकेने आपली बस सेवा सुरू केली. मात्र, तोट्यात असलेली ही बससेवा चालविणे मनपाला डोईजड जात असून, महामेट्रोकडून कुठलाही प्रस्ताव नसताना मनपाने ही बससेवा महामेट्रोकडे देण्याबाबतचा ठराव आज झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रस्तावाला काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांनी विरोध केला. नाशिक, पुण्यासह इतर शहरात अशी बससेवा महानगरपालिकेच आहे. पुण्यातही मेट्रो सुरू असून तिथे ही बससेवा महामेट्रोकडे सोपविण्यात आलेली नाही, याकडे त्यांनी बैठकीत लक्ष वेधले.
महानगरपालिकेतर्फे आपली बस शहरात सुरू आहे. यासाठी मनपात परिवहन समिती कार्यरत आहे. या समितीतर्फे बसचे संचलन केले जाते. ही बससेवा चालविण्यासाठी मनपाने तीन ऑपरेटरसोबत करार केला. या समितीचे अनेक सभापती होऊन गेले. या सभापतींनी आपल्या बसचे उत्पन्न वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, अपयशाशिवाय काहीच पदरी पडले नाही. आपली बसला दरमहा सुमारे 12 कोटीचा तर वर्षाला साधारणत: 100 कोटीचा तोटा सहन करावा लागतो. कोरोनामुळे मनपाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली असून, या बससेवेचा खर्च पेलणे मनपाला अवघड होत आहे. त्यामुळे परिवहन समितीने 478 बसेस महामेट्रोकडे देण्याचा प्रस्ताव परिवहन समितीने आज झालेल्या समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. त्या प्रस्ताव समितीने मंजुरी प्रदान केल्याचे समिती सभापती बाल्या बोरकर यांनी सांगितले.
वर्षाला 99.54 कोटींचा तोटा
महानगरपालिकेकडे 438 बसेस उपलब्ध आहे. केंद्र शासनाने 40 इलेक्ट्रीक मिडी बसेस खरेदी करण्यासाठी 20 कोटींचा खर्च येणार आहे. 360 लाल बसेस मनपा कोविड संसर्गापूर्वी संचालित करीत होती. शहरात मुख्य मार्गावर मेट्रो रेल्वेकडून परिवहन सेवा सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे याच मार्गावर मनपाचीही बससेवा सुरू आहे. त्यामुळे बससेवेत तोटा होऊ नये म्हणून समितीने मनपाची बससेवा महामेट्रोकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन समितीच्या मंजुरीनंतर प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवला जाईल. त्यानंतर राज्य सरकार व केंद्र सरकारची मंजुरी मिळाली तरच बससेवा हस्तांतरित करणे शक्य होईल, बाल्या बोरकर यांनी सांगितले.
फिडर बससेवेसाठी 18 बस
महामेट्रोने फिडर बससेेवेसाठी 18 बसेसची मागणी महानगरपालिकेकडे केली होती. त्यानुसार मनपाच्या परिवहन विभागातर्फे हा प्रस्ताव या बैठकीत ठेवला होता. या प्रस्तावाला बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली. 3500 रुपये प्रति बस याप्रमाणे मोबदला देण्याला महामेट्राची तयारी आहे. दुसरीकडे मनपा बस ऑपरेटरला प्रति दिन 9 हजार रुपये देत आहे. वास्तविक यापूर्वी 4500 रुपये प्रति दिनच्या आधारावर एक इलेक्ट्रिक बस महामेट्रोला देण्यात आली आहे. या प्रस्तावालाही परिवहन समितीने मंजुरी दिली आहे.
12 पैकी 6 सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात
मनपा परिवहन समितीत एकूण 12 सदस्य आहे. त्यापैकी सभापती बाल्या बोरकर यांच्यासह भाजपाचे नगरसेवक अर्चना पाठक, मनीषा धावडे, वैशाली रोहणकर, काँग्रेसचे नितीश ग्वालबंशी, नितीन साठवणे यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यांच्या जागी 6 सदस्यांची निवड आगामी मनपाच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.