नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) चमूने एनएनसी कंपनीचे गोदाम आणि कार्यालयावर धाड टाकून ४१ लाख रुपये किमतीची आयुर्वेदिक आणि युनानी औषधांसह स्टीकर जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी कंपनीचे बिडीपेठ येथील कार्यालय आणि नरसाळा येथील गोदामावर करण्यात आली.
एफडीएचे सहायक आयुक्त (औषधी) पुष्पहास बल्लाल यांना बिडीपेठ येथील एनएनसी मार्केटिंग प्रा.लि. कंपनीत हैदराबाद येथून विनालेबलच्या आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचा स्टॉक आल्याची माहिती मिळाली. या औषधांच्या बॉटलवर बिडीपेठ येथील कार्यालयात जास्त किमतीचे लेबल लावण्यात येत असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर बल्लाळ यांनी शुक्रवारी औषध निरीक्षक शहनाज ताजी, मोनिका धवड आणि स्वाती भरडे यांच्यासह चमूने कार्यालय आणि गोदामावर धाड टाकली. कंपनीचे भागीदार विजय तांदुळकर यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान लाखो रुपयांच्या औषधांची कच्ची बिले मागविल्याची माहिती उघड झाली. औषधांच्या लहानमोठ्या बॉटलवर संबंधित औषधांची माहिती आणि किमतीचे लेबल नव्हते. या बॉटलवर कार्यालयात जास्त किमतीचे लेबल लावून औषधांची विक्री करण्यात येत होती. चमूने औषधांसह लेबल आणि स्टीकर जप्त केले. अनेक औषधांच्या बॉटलवर एमआरपी ५,९९९ रुपये असल्याच्या नोंदीमुळे अधिकारीही आश्चर्यचकित झाले. देशातील मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांची औषधी एवढी महाग नसल्याचे तथ्य पुढे आले.
कनेक्शनची करताहेत चौकशी
औषधी हैदराबाद येथून मागविल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हैदराबाद कनेक्शनची चौकशी करण्यात येत आहे. अनेक औषधी लेबलविना होती. तर काही औषधांच्या लेबलवर जास्त असलेली एमआरपी आश्चर्यकारक आहे.
पुष्पहास बल्लाल, सहायक आयुक्त (औषधी), अन्न व औषधी प्रशासन विभाग.