नागपूर : नागपूर शहर देशाचे हृदयस्थान आहे आणि या शहरातील तसेच या शहरात येणाऱ्या नागरिकांनी एकाच जागी रेल्वे, मेट्रो, रस्ते, हवाई मार्ग अशा एकिकृत अत्याधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी अजनी परिसरात इंटर मॉडेल स्टेशन हब तयार करण्यात येत असल्याची माहिती एका पत्रपरिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
या महत्वाकांक्षी प्रकल्पाची आढावा बैठक आज नितीन गडकरी यांनी घेतली व त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.हा प्रकल्प एकूण २०० एकर जागेवर साकारणार असून यासाठी महामार्ग मंत्रालयातर्फे पहिल्या टप्प्यात १२०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी कॉनकोर, मेडिकल कॉलेज, पीडब्ल्युडी, कारागृह तसेच एफसीआय आदी प्रतिष्ठानांच्या जागा अधिग्रहीत करण्यात येणार आहे. कारागृह प्रशासन आणि राज्य पीडब्ल्युडी या जागांसाठी राज्य शासनाला विनंती करुन जागेची मागणी नोंदविण्यात येणार आहे. या प्रकल्पात परिसरातील सर्व छोट्या रेस्टॉरेन्टला जागा देण्यात येईल तसेच ई-रिक्षा, एसटी, मध्यप्रदेश एसटी, शहर बस, मेट्रो, रेल्वे तसेच ब्रॉडगेज मेट्रो आदी सुविधा एकत्रितपणे साकारण्याचा मानस आहे. मेट्रो रिजनमुळे नागपूर शहराबाहेरील शेजारचे जिल्हे जोडले जातील आणि या छाट्या शहरांना सॅटेलाईट टाऊनचा दर्जा मिळेल असेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रदुषणरहित साधनांच्या वापराला चालना देण्याचा मानस आहे. त्यासाठी एलएनजी, सीएनजी, चार्जिंग स्टेशन, पार्किंगसाठी प्रशस्त जागा, छोटे लॉज आदी सुविधा राहणार आहेत.हा प्रकल्प साकारत असताना जुनी रेल्वे कॉलनी व रहिवासी कर्मचाऱ्यांच्या निवासाचा मुद्दा प्राधान्याने सोडविण्यात येईल. ती जागा अधिग्रहीत केल्यानंतर या कर्मचाऱ्यांची कॉलनी प्रथम बांधण्यात येईल, त्यांना विद्यमान सुविधांपेक्षा तिप्पट अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याच भागात असलेल्या वृक्षांची समस्या आहे पण यातील बहुतांश झाडे पुन्हा प्रत्यारोपित करण्यात येतील. काही झाडे याच परिसरात तर काही झाडे महामार्गावर जागा निश्चित करुन प्रत्यारोपित करण्यात येणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
नागपूर शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. दोन टप्प्यात हे काम होणार असून पहिल्या टप्प्यात भूमि अधिग्रहण होईल त्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. यातून किमान १० हजार नवे रोजगा स्थानिक युवकांना उपलब्ध होणार आहेत. आगामी १५ वर्षाचा विचार करुन हे स्टेशन विकसित करण्यात येणार आहे. ४४ एकर जागेवर स्टेशन तयार होत असून हा संपूर्ण प्रकल्प ७०० एकर जागेत पसरलेला असेल. आगामी काळात बुलेट ट्रेन देखील येणार असून त्यासाठी देखील स्टेशन तयार करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, आ. नागो गाणार, उपमहापौर मनीषा धावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदी येथे लॉजिस्टीक्स हब
वर्धा मार्गावरील सदी रेल्वे येथे देशातील सर्वात मोठा लॉजिस्टीक्स हब साकारण्यात येणार असून कॉनकोर, एफसीआय यांचे गोडाऊन आणि मालवाहतूक सदी ड्रायपोर्टवरुन होईल. मिहानमधील हब केवळ हवाई कार्गोसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.चौकटमहाल सोडणार नाही, इलेक्ट्रीक वाहनाचा वापरनागपूर शहर प्रदुषणमुक्त रहावे यासाठी मी प्रथम सुरूवात करणार असून आजपासून मी डिझेलच्या वाहनाचा वापर बंद करीत असून यानंतर इलेक्ट्रीक वाहनाचा वापर करण्याचा तसेच केळीबाग रोड रुंदीकरणामुळे मी पश्चिम नागपुरात वास्तव्यास आहे पण महाल कधीच सोडणार नाही. लवकरच मी माझ्या घरी वास्तव्यास जाणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.