नागपुर : नागपुरात बुधवारी २७ नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता कोविड-१९ च्या रुग्णांचा आकडा १,१०५ झाला आहे. तर कन्हान कांद्रीच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणून बुधवारी ४५ रुग्ण निरोगी होऊन घरी परतले. यात नाईक तलाव व बांगलादेशच्या २४ रुग्णांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्हान कांद्री निवासी ५० वर्षीय पुरुष दहा दिवसांपूर्वी मुंबईतून परतला होता. त्याला सर्दी, खोकला व ताप होता. त्याने स्थानिक पातळीवर उपचार केला. परंतु बुधवारी सकाळी त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. सकाळी १० वाजता त्याचा घरीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कोविडच्या तपासणीसाठी मेयोत आणण्यात आला. सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला.
बुधवारी नीरीच्या लॅबमधून तपासण्यात आलेल्या १५१ नमुन्यापैकी १० नमुने पॉझिटिव्ह आले. यात ६ नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. तर ४ वानाडोंगरी येथील आहेत. नाईक तलावचे पॉझिटिव्ह व्हीएनआयटीमध्ये क्वॉरंटाईन होते. मेडिकलच्या लॅबमधून ७ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. यातील तीन रुग्ण सिम्बॉयसिसमध्ये क्वॉरंटाईन होते. माफसूच्या लॅबमधून ४, खाजगी लॅबमधून ३ नमुने पॉझिटिव्ह आले. एम्सच्या लॅबमधून ६५ नमुने तपासण्यात आले. यातून दोन नमुने नागपुर तसेच एक ब्रह्मपुरीतील नमुना पॉझिटिव्ह आला.
तीन दिवसात १०० रुग्ण
नागपुरात संक्रमितांची संख्या जून महिन्यात वेगाने वाढत आहे. १४ जून रोजी संक्रमित १००५ होते. अवघ्या तीन दिवसात हा आकडा ११०५ पर्यंत पोहचला. १ जून ते १७ जून दरम्यान ५६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ३१ मेपर्यंत नागपुरात ५४० रुग्ण होते. तर मार्च महिन्यात १६, एप्रिल महिन्यात १२२, मे महिन्यात ४०२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जून महिन्यात संक्रमितांची संख्या वाढत आहे.
४५ रुग्ण परतले घरी
बुधवारी ४५ रुग्ण निरोगी होऊन घरी परतले. यात मेयोतून २७, मेडिकलमधून ११ व एम्समधून ७ रुग्णांचा समावेश आहे. मेयोतून नाईक तलाव – बांगलादेशचे १९, सतरंजीपुरा येथील ४, पाचपावली १, सावनेर १, खापरखेडा १, हंसापुरीतील १ रुग्णाला डिस्चार्ज मिळाला. मेडिकलमधून नाईक तलाव-बांगलादेशचे ५, टेकडीवाडी १, गांधीबाग ४, आठवा मैल १ रुग्ण घरी परतले. एम्सतून डिस्चार्ज झालेल्या रुग्णाच्या एरियाची माहिती मिळू शकली नाही.