नागपुर : सलग तिसऱ्या दिवशीही रुग्णांची संख्या ३० वर गेली. सोमवारी ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांची संख्या १०४३ वर पोहचली आहे. शिवाय, मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या १७ झाली आहे. विशेष म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.
नागपुरात तीन दिवसांत १०२ रुग्णांची नोंद झाली. जून महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. यात मृत्यूची संख्या भर घालीत आहे. आज मृत्यू झालेला ५० वर्षीय रुग्ण श्वसनाच्या आजारावरील उपचारासाठी ८ जून रोजी मेडिकलमध्ये भरती झाला. त्याच दिवशी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या मेडिकलमध्ये १७९ रुग्ण उपचार घेत आहेत.
चंद्रमणीनगरातून चार रुग्ण पॉझिटिव्ह
नीरीच्या प्रयोगशाळेत २० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नाईक तलाव-बांगलादेश वसाहतीतून चार, मोमिनपुरा येथून पाच, हंसापुरी येथील तीन, भोईपुरा व इतवारी येथून प्रत्येकी एक, चंद्रमणीनगर येथील दोन, हिंगणा येथून तीन तर मानकापूर येथून एक २८ वर्षीय महिला आहे. या महिलेची मुंबर्ई प्रवासाची पार्श्वभूमी आहे. या सर्व रुग्णांना पाचपावली येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. मेयोच्या प्रयोगशाळेतून १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नाईक तलाव येथील सात, चंद्रमणीनगर येथील दोन तर शांतीनगर येथील एक रुग्ण आहे. शांतीनगर येथील हा रुग्ण मनपाचा कर्मचारी आहे. या सर्वांना राजनगर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. चंद्रमणीनगरातून चार रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वैशालीनगर येथेही कोरोनाचा शिरकाव
एम्सच्या प्रयोगशाळेत सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात वैशालीनगर वसाहतीतील एक रुग्ण आहे. पहिल्यांदाच या वसाहतीत रुग्णाची नोंद झाली. उर्वरित पाच रुग्णांमध्ये साईनगर हिंगण्यातील एक, एमआयडीसी रोड श्रमिकनगर येथील दोन, एमआयडीसी हिंगणा व अमरनगर एमआयडीसी हिंगणा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. हे सहाही रुग्ण वनामती येथे क्वारंटाईन होते. खासगी प्रयोगशाळेतून दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय विकारावरील उपचारासाठी भरती झालेला एक रुग्णाचा समावेश आहे. हा रुग्ण रुग्णालयातून सुटी घेऊन खासगी इस्पितळात जात असताना नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
मातृसेवा संघाने दिला मानवतेचा हात
किल्ला वॉर्ड महाल येथील एक गर्भवती महिला महालमधीलच मातृसेवा संघाच्या सूतिकागृहात भरती झाली. सोमवारी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला मेयोमध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती. याचदरम्यान प्रसवकळा सुरू झाल्या. तेथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून तातडीने पीपीई किट घातली. रुग्णालयातच तिची प्रसूती केली. मातृसेवा संघाने ऐनवेळी दिलेल्या मानवतेच्या हाताचे सर्वत्र कौतुक होत आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी अशा नऊ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
३३ रुग्णांंना डिस्चार्ज
एम्समधून १८, मेडिकलमधन १० तर मेयोतून पाच अशा ३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एम्समधून सुटी झालेले १६ रुग्ण नाईक तलाव, लोकमान्यनगर व गुमगाव येथील एक रुग्ण आहे. आतापर्यंत ६४८ रुग्ण रुग्णालयातून घरी परतले आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १२७
दैनिक तपासणी नमुने ५४४
दैनिक निगेटिव्ह नमुने ५१०
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १,०४३
नागपुरातील मृत्यू १७
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६४८
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३,५२३
क्वॉरंटाईन कक्षात एकूण संशयित २,२९९
पीडित- १,०४३-दुरुस्त-६४८ -मृत्यू-१७