मुंबई : प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानच्या निधनाला काही दिवस उलटले असताना नुकताच त्याच्या कुटुंबियांनी एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये वाजिद खान ज्या रुग्णालयात उपचार घेत होता तिथल्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले आहेत. कुटुंबियांनी सांगितले की वाजिदचा मृत्यू किडनी संसर्गामुळे नाही तर कार्डियक अरेस्टमुळे झाला आहे. परंतु कुटुंबियांनी केलेल्या स्पष्टीकरणामध्ये कोरोनाचा उल्लेख नाही. वाजिदचे निधन १ जून रोजी झाले होते. आता त्याच्या निधनाचे खरे कारण समोर आले आहे.
वाजिद खानच्या कुटुंबियांनी सांगितले की, ‘आपले प्रिय वाजिद खान यांनी वयाच्या ४७व्या अखेरचा श्वास घेतला. १ जून रोजी कार्डियक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. मुंबईच्या सुराना सेतिया रुग्णालयात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या वर्षी यशस्वीरित्या त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया पार पडली होती. त्यांनंतर घश्याचा संसर्ग बळावल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
1998 मध्ये साजिद-वाजिद या जोडगोळीने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाला संगीत देऊन आपल्या करिअरची सुरूवात केली होती.
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमान खानचे ‘प्यार कोरोना’ आणि ‘भाई भाई’ गाणेही साजिद-वाजिद जोडीने संगीतबद्ध केले होते. वाजिद यांचे ते शेवटचे गाणे ठरले.