नागपूर : पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळीय हालचाली सुरू असल्याचा परिणाम विदर्भावरदेखील झाला आहे. विदर्भात मंगळवारी जवळपास सर्वच ठिकाणी थंडावा होता. एकाही शहरात ४० अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली नाही. नागपुरात ३२.७ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. तर गोंदियामध्ये सर्वात कमी ३१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मंगळवारी सकाळी अनेक ठिकाणी पाऊस झाला. दिवसभर आकाशात ढगांचीच गर्दी होती. त्यामुळे कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सरासरीहून हा आकडा ९.७ अंश सेल्सिअसने कमी होता.
सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात ९.१ मिमी पाऊस नोंदविण्यात आला.
पश्चिम किनारपट्टीवरील स्थितीमुळे विदर्भात वातावरण बदलले आहे. विदर्भातील बहुतांश भागात ४ जूनपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर नागपूरसाठी हा इशारा ६ जूनपर्यंत जारी करण्यात आला आहे. वेगवान वाऱ्यांसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वर्धा येथे १ मिमी तर यवतमाळ येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली.