नागपूर, 02 जून : लॉकडाऊन कालावधीत महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आले होते. बेरोजगार झाल्या तरुण- तरुणांनी नोकरीत पुन्हा समावून घ्यावे, यासाठी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयापुढे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून निदर्शनं केली.
महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांना कंत्राट पद्धतीवर नियुक्ती करण्यात आली होती. जानेवारी महिन्यात कंत्राट संपल्याने मुदतवाढ मिळेल अशी या सर्वांना अपेक्षा होती. आयुक्त तुकाराम मुंढेंनी यासाठी मुदतवाढ दिली होती.
याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. नियमानुसार फेर प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचना स्थायी समितीने केली होती. मात्र, प्रशासनाने फेरप्रस्ताव न पाठविता या कनिष्ठ अभियंत्यांना कामावरून कमी केले.
निदर्शने केल्यानंतर अभियंत्यांनी महापौर संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष व विरोधी पक्षनेते यांच्याशी चर्चा करून कामावर परत घेण्याची मागणी केली आहे.
साई संस्थानने ही केली कर्मचाऱ्यांची पगार कपात
दरम्यान, कोरोनाच्या या संकटकाळात साईबाबा संस्थानने कर्मचाऱ्यांची 40 टक्के वेतनवाढ कमी केल्याने हजारो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. जे कर्मचारी घरी आहेत त्यांचा पगार कमी करणे ठीक आहे मात्र, आम्ही दिवसरात्र करूनही आमची पगार कपात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
साईसंस्थानच्या दोन्ही हॉस्पिटलसह नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर आणि आता कोरोना केअर सेंटरसारख्या अत्यावश्यक ठिकाणी काम करणाऱ्यांचे पगार कमी केल्याने आता आम्ही जगायचं कसं असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या या संकटकाळात राज्य सरकारला साईसंस्थानने 51 कोटींची मदत केली. कोरोना केअर सेंटर उभारले आहे. मात्र, त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी करणे अन्यायकारक असून त्यांनी आपला निर्णय रद्द करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.