नागपुर : हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा, सतरंजीपुरा व टिमकी या वसाहतीतून मोठ्या संख्येत रुग्ण दिसून यायचे. दरम्यानच्या काळात गोळीबार चौक, गड्डीगोदाम तर आता नाईक तलाव, बांगलादेश व भानखेडा येथे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी नोंद झालेल्या १९ रुग्णांमध्ये एक मनपाचा कर्मचारी आहे. हा रुग्ण वाठोडा या नव्या वसाहतीतील आहे. शिवाय, इंदोरा व जुनी मंगळवारीतही रुग्णाची नोंद झाल्याने नव्या वसाहतींमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढत चालला आहे. रुग्णांची एकूण संख्या ५५९ वर पोहचली आहे.
नागपुरात मार्च महिन्यात १६ रुग्ण, एप्रिल महिन्यात १२२ रुग्ण तर मे महिन्यात सर्वाधिक म्हणजे ४०२ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची वाढत्या संख्येने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. यात नव्या वसाहतींची भर पडत असल्याने सामान्यांमध्ये भीतीचे वातावरणही वाढत आहे. आज वाठोडा येथील गोपालकृष्णनगर येथील २७ वर्षीय मनपाचा कर्मचारी पॉझिटिव्ह आला. सतरंजीपुरा झोनच्या आरोग्य टीममध्ये हा कर्मचारी कर्तव्यावर होता. याचा रुग्ण किंवा संशयित रुग्णाशी थेट संपर्क नव्हता. परंतु तरी तो पॉझिटिव्ह आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पूर्वी मनपाचा नाईक तलाव येथील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. आता दुसरा कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसेवेत असलेल्या डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.
बांगलादेश, नाईक तलाव हॉटस्पॉट
मेयोच्या प्रयोगशाळेत आज १४ नमुने पॉझिटिव्ह आले. यात इंदोरा,भानखेडा व जुनी मंगळवारी वसाहतीतील प्रत्येकी एक, मोमिनपुरा येथील आठ, नाईक तलाव व बांगलादेश वसाहतीतून दोन तर एक वाठोडा येथील एक रुग्ण आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत पाच नमुने पॉझिटिव्ह आले. हे पाचही नमुने नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. आज सात रुग्ण याच वसाहतीतील आहेत. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांत बांगलादेश व नाईक तलाव वसाहतीतून ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे ही वसाहत नवीन हॉटस्पॉट ठरत आहे.
चार डॉक्टरांसह, ३७ परिचारिका व कर्मचारी क्वारंटाइन
सतरंजीपुरा झोनमधील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाचा चार डॉक्टर, तीन परिचारिका, हेल्थ वर्कर, डाटाएन्ट्री ऑपरेटर अशा ३७ लोकांचे नमुने घेण्यात आले. नमुन्यांचा अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाईन राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु नमुना निगेटिव्ह येताच कर्तव्यावर परतण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
चार रुग्णांना डिस्चार्ज
मेयोमधून आज दोन तर मेडिकलमधूनही दोन रुग्णांना सुटी देण्यात आली. मेयोतून बरे झालेल्या रुग्णांमध्ये एक मोमिनपुऱ्यातील पुरुष तर दुसरा रुग्ण गड्डीगोदाम येथील महिला आहे. मेडिकलमधून बरे झालेल्यांमध्ये मोमिनपुरा येथील १० वर्षांचा तर गड्डीगोदाम येथील १२ वर्षांचा मुलगा आहे. आतापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ३९० झाली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित २५२
दैनिक तपासणी नमुने ७०२
दैनिक निगेटिव्ह नमुने ६८३
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५५९
नागपुरातील मृत्यू ११
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३९०
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २७५८
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १९१२
पीडित-५५९-दुरुस्त-३९०-मृत्यू-११
Also Read : कोव्हिडचा प्रादुर्भाव संपेपर्यंत नियमीत सॅनिटायजींग सुरू ठेवण्याचे निर्देश : आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा