नागपूर, ता. २७ : शहरात उष्णतेची लाट वाढली आहे. नवतपा सुरू असल्याने उष्माघात होण्याचा धोका जास्त आहे. उष्णतेच्या लाटेपासून होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर निघणे शक्यतो टाळा, भरपूर पाणी प्या, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
उष्णतेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी मनपाने दिशानिर्देश जाहीर केले आहेत. याशिवाय उष्माघाताचा त्रास होत असल्यास मनपाच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात संपर्क साधावा तसेच मनपाच्या नियंत्रण कक्षात ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. याशिवाय रुग्णवाहिकेसाठी १०८ या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.
उष्माघात टाळण्यासाठी मनपातर्फे दिशानिर्देश जारी केले आहेत, त्यानुसार दररोजच्या तापमानाच्या माहितीसाठी रेडिओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करणे, तहान लागलेली नसताना सुद्धा भरपूर पाणी प्या, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरणे, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करणे, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवणे, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
याशिवाय घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, ग्रीन व सनशेडचा वापर करण्यात यावा. उन्हाळ्यात पक्ष्यांचे पाण्याविना हाल होउ नयेत यासाठी प्रत्येकाने घराच्या छतावर सावलीत पाणी आणि पक्ष्यांचे खाद्य ठेवावे, रात्री घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा, थंड पाण्याने वेळोवेळी आंघोळ करावी, कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. बांधकाम स्थळी किंवा अन्य ठिकाणी काम करणा-या कामगारांनी सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा, जास्तीत जास्त कामे पहाटेच्या वेळी करावीत, गरोदर महिला व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेत घरातच थांबावे, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.
हे टाळा
– लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका.
– दुपारी १२ ते ३ यावेळेत उन्हात निघणे टाळा
– गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळा
– दुपारी १२ ते ३ यावेळेत बाहेर जास्त तापमान असलयास शारिरीक कामे करणे टाळा
– उन्हात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवा
– चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेयामुळे शरिरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ही पेय टाळा
– शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळा
Also Read- कोव्हिड संदर्भात आवश्यक माहिती तीन दिवसात सादर करा!