नागपूर, ता. २१ : महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउन संबंधिचे नवीन आदेश निर्गमीत करण्यात आले असून नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आदेश २२ मे पासून अंमलात येणार आहेत. या आदेशामुळे नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. नवीन आदेशानुसार खाजगी कार्यालये पूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच मार्केट, मॉल्स, टॅक्सी सेवा बंद राहणार असून फक्त स्टॅन्डअलोन स्वरूपातील दुकाने (ती ही एका ओळोत जीवनावश्यक सेवेशी संबंधित दुकाने वगळता जास्तीत जास्त पाच) सुरू राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे १९ मे रोजी निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आले होते. मात्र शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार गुरूवारी (ता.२१) रात्री उशीरा निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूर शहर रेड झोनमध्ये कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शहरात खाजगी कार्यालये बंद राहणार असून अत्यावश्यक सेवेशी संबंधित शासकीय/निमशासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालये केवळ ५ टक्के कर्मचारी क्षमतेसहच तसेच जास्ती दहा कर्मचारी उपस्थितीसह सुरू राहणार आहेत.
यापूर्वी १७ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार स्टॅन्डअलोन स्वरूपात इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, संगणक, मोबाईल, होम अम्प्लायन्सेस दुरूस्ती, (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे परवानगी देण्यात आली होती. परंतू आता यामध्ये बदल होणार असून दिवसाचे वर्गीकरण हटविण्यात आले आहे. तसेच स्टॅन्डअलोन स्वरूपातील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवता येणार आहे.
प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने फक्त सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.
सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत ‘नाईट कर्फ्यू’
नवीन आदेशानुसार शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजतापर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांच्या आवागमनावर बंदी राहणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘नाईट कर्फ्यू’च्या काटेकोर पालना संबंधी पोलिस प्रशासनालाही आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यावर कारवाई सुद्धा पोलिस विभागामार्फत होणार आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात कोणतीही शिथिलता नाही
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही सेवेला परवानगी देण्यात आली नाही. प्रतिबंधित क्षेत्रामधून कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही किंवा बाहेरीला व्यक्तीला प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.
MHA द्वारे निर्गमीत करण्यात आलेली मानक कार्यप्रणाली
– सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक
– सार्वजिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी थुंकल्यास राज्य किंवा स्थानिक प्रशासनाद्वारे निर्धारित केलेल्या नियम आणि कायद्यानुसार दंड
– सार्वजनिक ठिकाणी आणि वाहतूक साधनांमध्ये सर्व व्यक्तींनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य
– लग्न समारंभामध्ये सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करून जास्तीत जास्त ५० लोकांना परवानगी
– अंत्यविधी प्रसंगी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करून ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू नये
– सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू आदींच्या सेवनाला बंदी
– दुकानांमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फुट अंतर राखणे तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही
कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त निर्देश
– शक्य तेवढे ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राथमिकता देणे
– कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठ आणि औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम/व्यवसायासाठी ठरवून दिलेल्या वेळेचे पालन करणे
– सर्व ठिकाणच्या प्रवेशाच्या आणि बाहेर निघण्याच्या द्वारावर थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश, सॅनिटाजरची व्यवस्था करणे
– संपूर्ण कामाचे ठिकाण, वारंवार संपर्कात येणा-या वस्तू जसे दरवाज्याचे हँडल आदी वेळोवेळी शिफ्टनुसार निर्जंतुक करणे
– कामाच्या ठिकाणी सर्व व्यक्ती, कामगारांमध्ये, त्यांच्या शिफ्टमध्ये आणि लंच ब्रेकमध्ये योग्य सुरक्षित अंतर असण्याची दक्षता संबंधित प्रमुख व्यक्तीने घ्यावी
कोव्हिड-१९ लॉकडाउन 4.0
नागपुरात काय सुरू आणि काय बंद
प्रतिष्ठाने आणि सेवा | रेड झोन | प्रतिबंधित क्षेत्र |
प्रवास- विमान, रेल्वे, मेट्रो | नाही | नाही |
आंतराज्य मार्ग वाहतूक | नाही | नाही |
शैक्षणिक संस्था | नाही | नाही |
हॉस्पीटॅलिटी, हॉटेल्स | नाही | नाही |
शॉपिंग मॉल | नाही | नाही |
उपासना व मोठ्या जमावाची स्थळे | नाही | नाही |
मद्यालये | होय/घरपोच विक्री | नाही |
६५ वर्षावरील व्यक्ती, १० वर्षाखालील मुले आणि गर्भवती महिलांना बाहेर फिरण्यास परवानगी | नाही | नाही |
वैद्यकीय सेवा, ओपीडी | होय | होय |
टॅक्सी, कॅब, रिक्षा | नाही | नाही |
चार चाकी वाहन | फक्त अत्यावश्यक सेवेसाठी | नाही |
दुचाकी वाहन | फक्त अत्यावश्यक सेवेसाठी | नाही |
आंतरजिल्हा बस सेवा | नाही | नाही |
जिल्हा अंतर्गत बस सेवा | नाही | नाही |
वस्तूंचा पुरवठा | होय | होय |
उद्योगधंदे (शहरी) | फक्त अत्यावश्यक वस्तू | नाही |
मोक्यावर मजूर उपलब्ध असलेल्या ठिकाणचे बांधकाम (शहरी) | होय | नाही |
इतर खाजगी बांधकाम | नाही | नाही |
शहरी एकल स्वरूपातील दुकाने | मर्यादित | नाही |
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने | होय | होय |
ई-कॉमर्स जीवनावश्यक वस्तू | होय | नाही |
ई-कॉमर्स जीवनावश्यक वस्तू वगळून | होय | नाही |
खाजगी कार्यालय | नाही | नाही |
शासकीय कार्यालय | ५ टक्के उपस्थितीत किमान १० जण | नाही |
कृषी विषयक कार्य | नाही | नाही |
बँक आणि फायनान्स | होय | नाही |
कुरियर, डाक सेवा | होय | नाही |
तातडीच्या वैद्यकीय प्रसंगी हालचाल | होय | होय |
केश कर्तनालय, सलून, स्पा | नाही | नाही |
स्टेडियम प्रेक्षकांविना | नाही | नाही |
घरपोच रेस्टॉरेंट सेवा | होय | नाही |
सहा.निबंधक/आर.टी.ओ./उप आर.टी.ओ. | होय | नाही |