नागपूर: लॉकडाउनमुळे गरीब, बेघर, गरजू, कामगार या सर्वांचेच हाल होत आहेत. या सर्वांची काळजी घेत मनपाने बेघर निवारा केंद्रामध्ये अशा व्यक्तींची व्यवस्था केली. मात्र जे आपली स्थिती सांगूही शकत नाही कुणाकडे जाउही शकत नाही अशा मुक्या जीवांसाठीही मनपानेच पुढाकार घेतला आहे. मनपाच्या कार्याला शहरातील अनेक सेवाभावी नागरिकांनीही सहकार्य दर्शविले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे दररोज शहरातील हजारो मोकाट प्राण्यांच्या अन्नाचा प्रश्न सुटला आहे.
लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात रस्त्यावर राहणारे प्राणी ज्यांचे जीवन हॉटेल मधून, घराघरांतून मिळणारे अन्नावर अवलंबून आहे. त्यांचीही मोठी वाताहत होत आहे. ही बाब लक्षात घेता मनपाद्वारे या प्राण्यांच्या अन्नासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात मनपाची टीम शहरातील विविध भागातील प्राण्यांना अन्न पुरविण्याच्या कार्यात सहकार्य करीत आहे. मनपाच्या या कार्याला शहरातील अनेक पशुप्रेमी तसेच सेवाभावी नागरिकांनीही सहकार्याने दर्शविले आहे. या सर्वांच्या सहकार्याने आज मनपाच्या माध्यमातून हजारो प्राण्यांना अन्न पुरविले जात आहे.
या सेवा कार्यासाठी मनपाचे दोन वाहन तसेच काही कर्मचारीही निस्वार्थ भावनेने कार्य करणा-या सेवाभावी नागरिकांच्या सहकार्यासाठी दिले आहेत. शहरातील अनेक भागात मोकाट प्राण्यांचा शोध घेउन त्यांना ताजे अन्न पुरविण्याचे कार्य अविरत सुरू आहे. यासाठी पाचपावली येथील गुरूनानक गुरूद्वारामधून जसमीतसिंग भाटीया आणि कर्नलजीतसिंग यांच्याद्वारे पोळ्या तयार करून देण्यात येतात. सुधा अग्रवाल यांच्याकडून या कार्यासाठी दोन हजार किलो गव्हाचे पीठ देण्यात आले आहे. तसेच किरीट जोशी यांच्या मार्फत दररोज १०० किलो गव्हाचे पीठ उपलब्ध करून दिले जाते.
घाटे रेस्टॉरेंटचे मालक विनोद घाटे यांनीही या कार्याला सहकार्य दर्शविले आहे. घाटे रेस्टॉरेंटमधून दररोज एक हजार पोळ्या आणि २५ लीटर दुध प्राण्यांसाठी दिले जात आहे. तर करिष्मा गलानी यांचे या कार्यामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्यामार्फत संपूर्ण शहरात ज्या ठिकाणी पशुप्रेमी किंवा नागरिकांद्वारे मोकाट प्राण्यांना अन्न पोहोचत नाही अशा विविध ठिकाणी मोकाट प्राण्यांना अन्न पोहोचविण्याचे कार्य त्या करीत आहेत. याशिवाय हिंगणा मार्ग, अंबाझरी आणि हिलटॉप परिसरात अंजली वैद्यार, छत्रपती चौक ते विमानतळ परिसर आणि नरेंद्रनगर परिसरात रीना त्यागी आणि अर्पणा मोडक, हजारीपहाड, दाभा, फुटाळा, अमरावती मार्ग परिसरात स्मिता मिरे, म्हाळगी नगर, मानेवाडा, बेसा, हुडकेश्वर परिसरात स्वप्नील बोधाने, नंदनवन, वाठोडा, मोठा ताजबाग, के.डी.के. कॉलेज परिसरामध्ये निकीता बोबडे, मानकापूर ते कोरोडी मंदिर परिसरामध्ये आशिष कोहळे, जरीपटका, सदर, पागलखाना, गिट्टीखदान परिसरात चार्ल्स लिओनॉर्ड, गोळीबार चौक, सतरंजीपुरा, शांतीनगर या परिसरामध्ये राम नंदनवार, गणेशपेठ नूतन रेवतकर, झिंगाबाई टाकळी, गोधनीमध्ये सौंदर्या रामटेके, गोपालनगर, प्रतापनगर परिसरात जया वानखेडे, मेडीकल चौक परिसरामध्ये एकांश ढोबळे असे अनेक सेवाभाजी नागरिक स्वत: अन्न तयार करून आपापल्या परिसरात प्राण्यांना देत आहेत. मनपाद्वारे अशा ९० सेवाभावी लोकांना मनपा प्रशासनाकडून परवानगी पास उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चहाटपरी चालविणा-या महिलेकडून प्राण्यांना रोज २० किलो पीठाच्या पोळ्या
मुक्या जीवांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी शहरातील अनेक सेवाभावी नागरिक पुढे आले आहेत. पशुप्रेम आणि माणुसकीच्या भावनेतून अन्नदानासाठी या सेवाभावी हातांनी मनपाच्या कार्याला सहकार्य दर्शविले आहे. मात्र ज्यांना पोटाच्या भूकेची जाणीव आहे, जे रोज कमविल्याशिवाय अन्नाचे दोन घास खाउ शकत नाही. अशांनीही या मुक्या जीवांची भूक शमविण्यासाठी सेवा कार्य हाती घेतले आहे. यापैकीच एक म्हणजे काटोल रोड परिसरात राहणा-या गीता देवत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गीता देवत ह्या चहा टपरी चालवितात. आज लॉकडाउनमुळे सारे काही बंद आहे. त्यामुळे छोट्याशा रोजगारातून होणारी त्यांची मिळकतही बंद आहे. त्या दररोज निस्वार्थपणे मोकाट प्राण्यांना पोळ्या देण्याचे कार्य करीत आहे. या कार्यासाठी सुरूवातीला पोलिसांकडून अडविण्यात आले. मात्र त्यांचे कार्य पाहता आज आशिष दुबे हे पोलिस कर्मचारीही त्यांना साथ देत स्वत:च्या दुचाकीवरून त्यांना अन्न पोहोचविण्यासाठी नेउन देतात. आजघडीला गीता देवत ह्या रोज २० किलो गव्हाच्या पीठाच्या पोळ्या स्वत: तयार करून स्वत:च त्या प्राण्यांना नेउन खाउ घालण्याचे कार्य करीत आहेत.
Also Read- जेईई आणि नीट परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन्ही परीक्षा जुलैमध्ये