नागपूर : विदर्भात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होऊन दीड महिन्यावर कालावधी झाला असताना, शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, मधल्या काळात रुग्णसंख्या स्थिर असलेल्या अकोल्यात आता रुग्ण वाढू लागले आहेत.
रविवारी १५ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. शिवाय, अमरावतीत दोन तर नागपुरात एका रुग्णाची नोंद झाली. या रुग्णांसह विदर्भात एकूण रुग्णसंख्या ३८० झाली आहे. नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत ३० वर्षीय महिलेचा नमुना आज पॉझिटिव्ह आला. नागपुरात रुग्णाची संख्या १५१ वर पोहचली आहे. रविवारी आणखी दोन रुग्णांचे नमुने १४ दिवसानंतर निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. नागपुरात पहिल्यांदाच पॉझिटिव्ह गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. या महिलेची नॉर्मल प्रसूती झाली असून, तिने एका मुलाला जन्म दिला.
अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी १५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यातच दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्याची रुग्णसंख्या ५५ वर पोहचली आहे. अमरावती जिल्ह्यातही आणखी दोन रुग्णांचे निदान झाले. येथील रुग्णसंख्या ५५ झाली आहे. तीन रुग्णांच्या मृत्यूने येथील मृताची संख्या १० वर गेली आहे. बुलडाण्यातील रुग्णसंख्या एक आठवड्यापासून २४ वर स्थिरावली आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व वाशीम जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाची नोंद आहे.
Also Read- Days After Facebook Deal, Jio Platforms Gets Rs 5,655.75 Crore Investment from Silver Lake