नागपूर : नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील रुग्णांची संख्या वाढीसाठी काही ‘हॉटस्पॉट’ कारणीभूत ठरले आहेत. शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘मास्टर प्लॉन’ तयार करण्यात आला आहे. या ‘मास्टर प्लॉन’ नुसार ‘हॉटस्पॉट’ मधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येणा-या लोकांचा शोध घेउन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे व सर्वांचे कोरोना ‘स्वॅब’ घेतले जात आहे. मनपा आयुक्तांच्या या ‘मास्टर प्लॉन’ नुसार कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या सतरंजीपुरा भागात कार्य सुरू झाले आहे. आतापर्यंत सतरंजीपुरा भागातील १७०० पेक्षा जास्त जणांना ‘क्वारंटाईन’ करून मनपाच्या ‘कोविड केअर सेंटर’ मध्ये आणण्यात आले आहे.
आजघडीला शहरात कोरोनाचे १३४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी बहुतांशी रुग्ण हे सतरंजीपुरा भागातीलच आहेत. त्यामुळे या भागातील कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न मनपातर्फे केले जात आहेत. सतरंजीपुरा परिसरात एका कोरोनाबाधित व्यक्तीमुळे कोरोनाच्या संसर्गाची मोठी साखळी निर्माण झाली. ही साखळी खंडीत करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या परिसरातील २८० घरांमधील १७०० पेक्षा जास्त लोकांना ‘क्वारंटाईन’ करून त्यांना मनपाच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले आहे. यासर्वांचे ‘स्वॅब’ घेण्याचे काम सुरू आहे. ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह येणा-या रुग्णावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारही सुरू आहेत.
शहरात आतापर्यंत १४५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुण आढळले असून यापैकी ४० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरात सुमारे ९६ ‘ॲक्टिव्ह’ केसेस असून त्यापैकी ८८ रुग्ण फक्त सतरंजीपुरा परिसरातील आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मनपातर्फे अहोरात्र काम सुरू आहे. नागरिकांनीही कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
Also Read- धक्कादायक: ३५० किलोमीटर पायपिटीनंतर मजुराने घेतला गळफास