नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आता यशस्वी परिणाम दिसू लागला आणि त्यामुळेच देशात संक्रमित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. त्याचबरोबर देशातील 325 जिल्ह्यांत अद्याप एकही कोरोनाबाधित आढळला नसल्याची माहितीही देण्यात आली.
दरम्यान, गुरुवारी देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 12 हजार 380 आणि बळींची संख्या 414 झाली. यामध्ये गेल्या 24 तासांतील 941 नवीन रुग्णांचा आणि 37 जणांच्या मृत्यूचा समावेश आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे आता परिणाम दिसू लागले आहेत. संक्रमणाने प्रभावित झालेल्या 17 राज्यांच्या 27 जिल्ह्यांत गेल्या 14 दिवसांपासून एकही कोरोनाबाधित आढळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारे पुद्दुचेरीच्या माहे जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांपासून संक्रमणाचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. संक्रमणाची साखळी तुटण्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
अग्रवाल यांनी सांगितले की, संक्रमण प्रभावित ज्या जिल्ह्यांमध्ये दोन आठवड्यापासून एकही रुग्ण आढळला नाही, त्यामध्ये बिहारमधील पाटणा, पश्चिम बंगालमधील नादिया, राजस्थानमधील प्रतापगड, गुजरातमधील पोरबंदर, गोव्यातील दक्षिण गोवा, उत्तर प्रदेशमधील पीलिभीत, जम्मू-काश्मीरमधील राजौरी, उत्तराखंडमधील पौढी गढवाल, छत्तीसगडमधील राजनंदगाव, कर्नाटकमधील बेल्लारी, केरळमधील वायनाड, हरियानातील पानिपत आणि मध्य प्रदेशमधील शिवपुरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिलवरून वाढवून 3 मेपर्यंत करण्याची घोषणा केल्यानंतर बुधवारी गृहमंत्रालयाने मोठ्या प्रमाणात संक्रमण असलेले 170 हॉटस्पॉट जिल्हे आणि 207 संभाव्य हॉटस्पॉट जिल्ह्यांची यादी जाहीर करत या जिल्ह्यांमध्ये संक्रमण विरोधी मोहीम राबविण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले. अग्रवाल म्हणाले की, 20 एप्रिलपर्यंत संक्रमणमुक्त 325 जिल्ह्यांसह देशातील अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमण रोखण्याच्या उपायांची कठोर अंमलबजावणी आणि निरीक्षण केले जात आहे.
रुग्ण बरे होणे चांगला संकेत
देशात संक्रमित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे आणि हा एक चांगला संकेत असल्याचे सांगत अग्रवाल यांनी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत 11.4 टक्क्यांवरून वाढून 12.02 टक्के झाले असल्याची माहिती दिली. त्यामुळे आतापर्यंत 1498 रुग्णांना उपचारानंतर बरे वाटत असल्याने रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत स्वस्थ झालेल्या 184 रुग्णांचाही समावेश आहे.
Also Read- राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3202 वर, बळींचा आकडा 194; तर 52,762 नमुने कोरोना निगेटिव्ह