नागपूर: तडाखेबाज आणि वादळी निर्णयांनी वादग्रस्त ठरलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना महाविकास आघाडीने, भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून पाठविले आहे. लोकप्रतिनिधींशी कायम संघर्षाची भूमिका घेणाऱ्या मुंढेंची, भाजपच्या गडातील मुसंडी कशी असेल, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीने आज आयएएस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्या. त्यातील एका बदलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काम करण्याच्या कठोर आणि कणखर भूमिकेमुळे जागोजागी वादग्रस्त ठरलेले तुकाराम मुंढे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावाखाली चालणाऱ्या नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून पाठविले आहे. गेल्या तेरा वर्षांत मुंढे यांची बारावेळा बदली झालेली आहे. महापालिकेचे विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांना अद्याप पोस्टिंग देण्यात आलेली नाही, ते पदाच्या प्रतीक्षेत आहेत.
२००५ च्या कॅडरचे अधिकारी असलेले तुकाराम मुंढे २००५ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीवरून तत्कालीन लोकप्रतिनिधी व कर्मचारी संघटनेसोबत त्यांचा जोरदार वाद झाला होता. सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार बंद करून हजेरीपट ताब्यात घेऊन लेटलतिफांना शिस्त लावण्याचा प्रकार त्यांनी केल्याने कर्मचारी संघटनेने आंदोलन केले होते. त्यांच्या काळातच नागपूर जिल्हा परिषदेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी ड्रेस कोड लागू केला होता. नागपूरनंतर ते नाशिकला आदिवासी आयुक्तालयात गेले होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उशीर झाल्याने पंढरपूरच्या मंदिरात पूजा केली होती. त्याची मोठी चर्चा त्यावेळी झाली. नवी मुंबईला आयुक्त म्हणून गेल्यानंतर त्यांनी अवैध बांधकामाविरुध्द कारवाई केली. त्यामुळे आमदार मंदा म्हात्रे व माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशी खटकले होते. नवी मुंबई महापालिकेतही ‘टॉक विथ कमिश्नर’ सारखे उपक्रम राबवून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला होता. नाशिकमध्येही त्यांच्या स्वभावामुळे अविश्वास प्रस्ताव आणण्याची चर्चा होती. नगरसेवक व भाजप आमदारांसोबत त्यांचे खटके उडाले होते. मात्र, नाशिककरांनी त्यांना जोरदार समर्थन दिले होते.
महापौरांकडून स्वागत
महापौर संदीप जोशी यांनी,’तुकाराम मुंढे हे चांगले अधिकारी आहेत, त्यांचे शहरात स्वागत आहे. शहराच्या विकासात त्यांचा निश्चितच हातभार लागेल,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी मुंढे यांची बदली ही प्रशासकीय बाब असल्याचे सांगत त्यावर अधिक बोलणे टाळले. मुंढे यांच्या काळात मनपातील प्रशासकीय घडी आणखी सुधारेल, असेही त्यांनी नमूद केले.