मुंबई, 17 जानेवारी : बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘लव्ह आज कल 2’ (Love Aaj Kal 2) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही फ्रेश आणि बहुचर्चित जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. काल या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘लव्ह आजकल 2’ (Love Aaj Kal 2) हा सिनेमा अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता रिलीज झालेल्या या ट्रेलरमध्ये कार्तिक साराची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ही कथा आहे वीर आणि जुईची. या सिनेमात सारा एका बिनधास्त मुलीच्या भूमिकेत तर कार्तिक एका थोड्याशा लाजऱ्या आणि गोंधळलेल्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण या व्यतिरिक्त या सिनेमात आणखी एक अभिनेत्री दिसत आहे. त्यामुळे या सिनेमात लव्ह ट्रॅन्गल पाहायला मिळणार आहे.
सारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने एका इव्हेंटमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव्ह आज कल 2’ (Love Aaj Kal 2) साठी साइन केलं आणि यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली. पण दरम्यानच्या काळात या दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही समोर आलं आहे.
इम्तियाज अली यांचं दिग्दर्शन असलेला ‘लव्ह आज कल 2’ (Love Aaj Kal 2) हा सिनेमा 2009 मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आज कल’ चा सिक्वेल आहे. फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सारा आणि कार्तिकचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.