नागपूर: ‘ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांमध्ये मुस्लिमांचा मोठ्या संख्येने अंतर्भाव होता, ज्यांचा गुप्त सल्लागार मुल्ला हैदर होता, त्या छत्रपतींच्या नावाने आज हिंदू-मुस्लिम अशी धार्मिक तेढ निर्माण करण्यात येत आहे. धर्माच्या नावाखाली लोकांना लढविण्यात येत आहे; यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही,’ अशी खंत साहित्यिक, इतिहासकार डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांनी बुधवारी मारवाडी फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात आलेल्या प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक विजय दमानी तर प्रमुख अतिथी म्हणून कराड येथील कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांना एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना साहिल यांनी वर्तमान सामाजिक व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. ‘हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कुठल्याही धर्माचा ग्रंथ तपासल्यास बंधुता, एकता, प्रेमाचा आणि प्रत्येकाने ‘स्व’चा शोध घेण्याची शिकवण दिल्याचे आढळले. आज आपण ती शिकवण बाजूला सारून मनमर्जी जगू लागलो आहोत. परिणामत: धार्मिक भेदाभेद, ताणतणाव निर्माण झाले आहेत. मानवतेचा धर्म मनुष्य विसरला आहे. सत्तेसाठी, स्वार्थासाठी एकमेकांना पायाखाली चिरडणे, समोरच्याला नामोहरम करणे, कटकारस्थान रचण्याचे कार्य सुरू आहे. धर्माच्या नावाखाली माणसामाणसाला तोडण्यात येत आहे. ब्रिटिशांनी ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबिली. आजही तेच चित्र आहे. यावर सर्वांनी विचार करून मानवतेचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे’, असे साहिल म्हणाले.
तत्पूर्वी, सेवानिवृत्त न्यायमूर्ती सिरपूरकर म्हणाले,’नागपूरकरांनी कायम धार्मिक एकतेचा संदेश दिला आहे. धर्म, पंथ, जातीच्या पलीकडे जात चांगल्या लोकांना गौरवान्वित केले आहे. आज एका मुस्लिम साहित्यिकाला मारवाडी फाउंडेशन पुरस्कार प्रदान करीत आहे, यातच नागपूरकरांचे वैशिष्ट्य दिसून येते.’
समाजाच्या उत्थानासाठी प्रबोधनाची गरज असून ‘बोले तैसा चाले’ असे वागणाराचा खरा प्रबोधनकार असल्याचे डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी सांगितले. प्रास्ताविकपर भाषणात डॉ. गिरीश गांधी यांनी, महापुरुषसुद्धा समाजानुसार, जातीपातीनुसार विभागल्या गेल्याची चिंता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन सुधीर बाहेती यांनी केले. कार्यक्रमाला आमदार गिरीश व्यास, अतुल कोटेचा, पूनमचंद मालू, सुरेश राठी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.