नागपूर: मिहानपासून काही अंतरावर असलेल्या सुमठाणा परिसरात वनविभागाला वाघाच्या पावलांचे ठसे बुधवारी आढळून आले. त्यामुळे, या परिसरात वाघ येऊन गेल्याचे किंवा अद्यापही असल्याचे निश्चित झाले आहे. या परिसरात वनविभागाने कॅमेरा ट्रॅप लावले नव्हते. त्यामुळे, वाघाची छायाचित्रे टिपता आलेली नाहीत. पावलांचे ठसे मिळाल्यानंतर आता या भागात वनविभागाने कॅमेरा ट्रॅप लावण्याचे काम सुरू केले आहे. या कॅमेरांमध्ये छायाचित्रे आल्यास या भागातील वाघाचे अस्तित्व निश्चित होणार आहे.
शुक्रवार रात्रीपासून मिहान आणि लगतच्या परिसरात ठाण मांडून बसलेल्या वाघाभोवती आता अफवांचे धुके जमा झाले आहेत. मध्यरात्री वाघ दिसला, एक नव्हे दोन वाघ आहेत, अशा अनेक अफवा बुधवारी दिवसभर सुरू होत्या.
मिहानमधील इन्फोसिस परिसरात शुक्रवारी वाघाचे ठसे दिसून आले होते. त्यानंतर, मिहान आणि आजूबाजूच्या गावांमध्ये वनविभागाने वाघाच्या शोधाची मोहीम राबविली. रविवारी कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाची छायाचित्रे आढळून आली होती. मात्र, तेव्हापासून अद्यापपर्यंत कुठेही वाघाचे दर्शन झाल्याची खात्रीलायक माहिती वनविभागाला मिळालेली नाही. एकीकडे वनविभागाचा शोध सुरू असताना ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये वाघाशी संबंधित विविध अफवांना जोर चढला आहे. वाघ दिसल्याचे दावे करणाऱ्या सूचनाही वनविभागाकडे येणे सुरू झाले आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी सोशल मीडियावर या वाघाचा संदर्भ देत एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. मिहानमध्ये एक नव्हे तर एक वाघ आणि एक वाघीण असल्याचे या व्हिडियोतून दाखविण्यात आले आहे. मात्र, हा व्हिडीओ मिहान परिसरातील नसून, ही केवळ अफवा असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर विमेन या कॉलेजपासून काही अंतरावर बुधवारी रात्री वाघ दिसल्याचे सांगण्यात येते आहे. या रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन युवकांनी वाघ दिसल्याचा दावा केला आहे.
गावांमध्ये बैठकांतून जागृती
वाघासंदर्भात अफवांचे पीक आल्याने वनविभागाने जनजागृती सुरू केली आहे. सुमठाणा आणि इतर गावांमध्ये बैठका घेणे सुरू करण्यात आले आहे. वनविभागाचे अधिकारी ग्रामस्थांशी संवाद साधत असून वाघासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि इतर बाबींबाबत जनजागृती करीत आहेत. ‘हा सगळा परिसर वनविभागाच्या हिंगणा, सेमिनरी हिल्स आणि बुटीबोरी यांच्यामध्ये येतो. त्यामुळे, वाघाचे अस्तित्व आढळल्यास वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्यात स्पष्टता निर्माण करणे सुरू आहे. वाघासंदर्भात ग्रामस्थांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी सरपंचाला कळवावी आणि सरपंचाकडून वनविभागाला मिळावी, असे आवाहन आम्ही करीत आहोत’, असे नागपूरचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांनी सांगितले.