आज धम्मक्रांतीचा ६३वा वर्धापनदिन सोहळा; निळी पाखरे ऊर्जाभूमीत दाखल
नागपूर: माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार न देणारा धर्म नाकारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ रोजी समता, करुणेचा संदेश देणारा बौद्ध धर्म स्वीकारला. या स्मृतीला उजाळा देण्यासाठी लाखो बौद्ध उपासक दरवर्षी दीक्षाभूमीवर येऊन समतेचा जागर करतात. त्याची आठवण म्हणून आज, मंगळवारी धम्मक्रांतीचा ६३वा प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्य सोहळ्याला सायंकाळी ६ वाजता सुरुवात होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयदशमीच्या दिवशी ज्या जागेवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन संपूर्ण देशात सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली त्या जागेवर नतमस्तक होऊन महामानवाला अभिवादन करण्यासाठी वर्षभर या सोहळ्याची देशविदेशातील बौद्धबांधव वाट पाहतात. डॉ. आंबेडकर स्मारक समितीतर्फे आयोजित सोहळ्यातील मुख्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून थायलंडचे पूज्य भन्ते डॉ. परमहा अनेक व म्यानमारचे महाउपासक टेंग ग्यार यांची उपस्थिती राहणार आहेत. अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई असतील. सोहळ्याला जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट अशा जगभरातील भिक्षूंसह विद्वान बौद्ध प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे.
‘धम्मपहाट’ने होणार सुरुवात
मंगळवारी सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत स्मारक समितीतर्फे ‘धम्मपहाट’अंतर्गत बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम होईल. सकाळी ९ वाजता भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते सामूहिक बुद्धवंदना घेण्यात येईल. त्यानंतर दीक्षा देण्याचा कार्यक्रम सुरू राहील. सायंकाळी ६३व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा मुख्य कार्यक्रम होईल. स्मारक समिती अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी असतील. थायलंडचे भदन्त डॉ. परमहा अनेक, म्यानमारचे टँग ग्यार प्रमुख पाहुणे असतील.
हे रस्ते राहणार बंद
– काचीपुरा चौक ते माताकचेरी चौक
– काचीपुरा चौक ते कल्पना बिल्डिंग
– माताकचेरी चौक ते कृपलानी टर्निंग पॉइंट चौक
– माताकचेरी ते नीरी रोड टी पॉइंट
– माताकचेरी चौक ते लक्ष्मीनगर चौक
– काचीपुरा चौक ते बजाजनगर चौक
– बजाजनगर चौक ते लक्ष्मीनगर चौक
वाहन पार्किंग व्यवस्था
– हिस्लॉप कॉलेज हॉकी मैदान
– यशवंत स्टेडियमसमोरील मॉरिस कॉलेज मैदान
– हडस हायस्कूल पटांगण, रामदासपेठ
– आयएमए हॉल, रामदासपेठ
– धरमपेठ हायस्कूल पटांगण
– धरमपेठ कॉमर्स कॉलेज पटांगण
– इंडियन जिमखाना पटांगण, धंतोली
– न्यू इंग्लिश हायस्कूल पटांगण, काँग्रेसनगर
– बजाजनगर बास्केटबॉल मैदान
– होमगार्ड कार्यालय, काँग्रेसनगर
– परांजपे शाळा लक्ष्मीनगर
– सायंटिफिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी, लक्ष्मीनगर
– लक्ष्मीनगर मनपा झोन कार्यालय
– एलएडी कॉलेज, शंकरनगर
या मार्गांवर आपली बसची विशेष सेवा
– दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस व परत
– दीक्षाभूमी ते अंबाझरी टी पॉइंट व परत
– कपिलनगर ते दीक्षाभूती व परत
– नारा ते दीक्षाभूमी व परत
– आंबेडकर पुतळा ते दीक्षाभूमी व परत
– रामेश्वरी ते दीक्षाभूमी व परत
– भीम चौक ते दीक्षाभूमी व परत
– वैशालीनगर ते दीक्षाभूमी व परत
– राणी दुर्गावतीनगर ते दीक्षाभूमी व परत
– गरोबा मैदान ते दीक्षाभूमी व परत
नि:शुल्क विद्यापीठ मार्गदर्शिका वाटप
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीवर माहिती व मार्गदर्शन केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे. याच केंद्रात मंगळवारी सकाळी १०.३० वाजता विद्यार्थ्यांकरिता नि:शुल्क विद्यापीठ मार्गदर्शिकेचे वितरण करण्यात येणार आहे. विद्यापीठ मार्गदर्शिकेमध्ये ‘मागासवर्गीय सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन, राज्य शासन व विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम व कार्यक्रमांसंबधीची माहिती मागासवर्गीयांसाठी विद्यापीठात उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा, केंद्र व राज्य शासनाद्वारे निर्गमित केलेले शासन निर्णय, आरक्षण धोरण, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आदी संबंधीची अद्ययावत व महत्त्वपूर्ण माहिती समाविष्ट केलेली आहे. माहिती व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन व पुस्तिकेचे विमोचन नागालॅण्डचे पोलिस महानिरीक्षक संदीप तामगाडगे, अॅड. फिरदोस मिर्झा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्रमुख अतिथी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. मिलिंद बाराहाते आणि प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी, माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम उपस्थित राहतील.
महामानवाचरणी लाखो अनुयायी नतमस्तक
धम्मक्रांतीच्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी महामानवाने मनामनात चेतवलेली समतेची मशाल हाती घेत राज्यासह देशभरातील भीमसैनिकांचा जनसागर गेल्या दोन दिवसांपासून दीक्षाभूमीवर अवतरला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो भीमसैनिकांचे जत्थेच्या जत्थे तथागत गौतम बुद्ध आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक झाले.
हातात पंचशील ध्वज, डोक्याला निळ्या पट्ट्या, पांढरा पोशाख, महामानवाने मनात चेतवलेली समतेची मशाल आणि उरात भरलेला प्रचंड आत्मविश्वास घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यांमधून हजारो आंबेडकर अनुयायी पदरमोड करीत महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर अवतरले आहेत. दसऱ्याच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धम्मदीक्षा सोहळ्यात सहभागी होऊन बाहेरगावचे आंबेडकर अनुयायी सीमोल्लंघन करतात. शतकानुशतके व्यवस्थेच्या गुलामगिरीत जखडलेल्या वंचितांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा देऊन नवी क्रांती घडविली. त्यानुषंगाने मुंबई, पुणे, जळगाव, धुळे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, बीड, औरंगाबाद, रत्नागिरी, बेळगावपासून ते मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेशातील शेकडो भीमसैनिकांच्या अलोट गर्दीने दीक्षाभूमीचा परिसर अरक्षरशः निळाईने गजबजून गेला आहे.
विचारांचा ठेवा
डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीचा जीव की प्राण असलेल्या पददलितांच्या वेदनेचा हुंकार भरणारे साहित्य प्रस्थापितांनी नाकारले. त्यामुळे बाबासाहेबांनी दीनदुबळ्यांना शिक्षणाच्या वाघिणीचे दूध पाजले. बाबासाहेबांच्या या हाकेला प्रतिसाद देत चळवळीचा आत्मा असलेल्या साहित्याच्या खरेदीसाठी दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवरही गर्दी दिसून येत आहे. पुस्तकांसोबतच मूर्तींचे स्टॉल आणि क्रांतीचा संदेश देणाऱ्या भीमगीतांच्या सीडीचे स्टॉलही गर्दीने फुलून गेले आहेत. सामाजिक स्थित्यंतराची ताकद ठेवणाऱ्या नव्या दमाच्या पिढीतही आंबेडकरी साहित्याची जबदस्त ‘क्रेझ’ आहे.
आठवडाभरापासूनच दाखल
दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा मंगळवारी असला तरी मागील दोन दिवसांपासून देशातील विविध भागांतून बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला भेट देऊन महामानवाच्या चरणी नतमस्तक झाले. देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांचे स्वागत करण्यात आले. पंचशील ध्वज आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली गीते, पोवाडे गात राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी दीक्षाभूमीत दाखल झाले आहेत. दीक्षाभूमी आता फुलली आहे. देशभरातील अनुयायी आता या ऊर्जाभूमीत दाखल झाले आहेत. यात खासकरून काही अनुयायी आठवड्याभरापूर्वीच दीक्षाभूमी गाठतात हे विशेष!