नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे संचालित ‘आपली बस’च्या ताफ्यातील ‘बायो-सीएनजी’वर परिवर्तीत केलेल्या बसने राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मस्त्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी प्रवास केला. नागपुरात असलेल्या पर्यावरणपूरक वाहतुकीचे कौतुक करीत येथे वाहतुकीसंदर्भात सुरु असलेले प्रयोग राज्याच्या अन्य जिल्ह्यात अंमलात आणण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
नामदार महादेव जानकर यांनी शनिवारी आकस्मिक नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी व आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. त्यानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासोबत त्यांनी नागपुरात सुरू असलेल्या विविध अभिनव आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांबाबत चर्चा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात असलेल्या आणि आयुष्य संपलेल्या सुमारे ४३७ डिझेल बस बायो-सीनजीमध्ये परिवर्तीत करण्याचे मनपाने ठरविले. आतापर्यंत ४८ डिझेल बस बायो-सीएनजीमध्ये परिवर्तीत करण्यात आल्या. या बसची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी बसचा प्रवास करण्याचे ठरविले. नागपूर महानगरपालिका परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी या संपूर्ण प्रकल्पाबाबत त्यांना माहिती दिली.
खापरी येथील डेपोला भेट देऊन बायो-सीएनजीवर परिवर्तीत झालेल्या बसेसची त्यांनी पाहणी केली. सभापती जितेंद्र कुकडे आणि ट्रॅव्हलटाईम्सचे मेनटन्स मॅनेजर अविनाश भुजाडे यांनी त्यांना बसबाबत माहिती दिली. ज्या बस भंगारमध्ये जाणार होत्या त्यांना बायो-सीएनजीवर परिवर्तीत करून आठ वर्षांनी त्या बसचे आयुष्य वाढविले आहे. यामुळे मनपाच्या २०० ते ३०० कोटी रुपयांची बचत झाली आहे. एक बस बायो-सीएनजीवर परिवर्तीत करण्यासाठी केवळ साडे तीन लाख रुपयांचा खर्च आला. यामुळे बसचा एव्हरेज वाढला असून आवाजामुळे होणारे प्रदूषणही कमी झाले आहे. अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प असून हा पथदर्शी ठरत आहे. यासोबतच आता आठ इलेक्ट्रिक बस ‘आपली बस’च्या ताफ्यात येत असून नागपूर महानगरपालिका भविष्यात पूर्णपणे पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा राबविणारी महानगरपालिका असेल, अशी माहिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी नामदार महादेव जानकर यांना दिली.
या प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या नामदार महादेव जानकर यांनी आपल्या मतदारसंघात व राज्याच्या अन्य भागात असा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपुरात सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचीही त्यांनी प्रशंसा केली. यावेळी त्यांनी खापरी डेपो-मिहान असा बस प्रवास केला. यावेळी उपायुक्त राजेश मोहिते, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक प्रभू बोकारे, ट्रॅव्हलटाईम्सचे व्यवस्थापक राहुल जाधव, अविनाश भुजाडे उपस्थित होते.
यावेळी परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी तुळशीचे रोप देऊन नामदार महादेव जानकर यांचे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वागत केले.