सुरेंद्र नगर येथील राधाकृष्ण मंदिर, डॉ. डांगरे यांच्या दवाखान्याजवळ येथे दैनिक लोकमतचे संपादक गजानन जानभोर यांच्या हस्ते दीनदयाल अनोखे दुकानाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित होते. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते व महाराष्ट्र राज्य लघु विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांची विशेष उपस्थिती होती. श्री माई महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष उषा निशितकर तसेच सचिव श्रीमती कल्पना घाटाले दोन्ही संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रस्ताविकात नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते व महाराष्ट्र राज्य लघु विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. युवा झेप प्रतिष्ठान द्वारे दीनदयाल थाली, दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्प, सायन्स एक्संलोटरी, दीनदयाल फिरता दवाखाना आणि आता याच श्रृंखलेत दीनदयाल अनोखे दुकान हे उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे येथील ठोंबरे ताई यांनी अनोखे दुकान सुरु केल्याची माहिती वर्तमानपत्रातून मिळाली. हे अनोखे दुकान नागपूरमध्येही सुरू व्हावे याच संकल्पनेतून दीनदयाल अनोखे दुकान सुरु झाले असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रकल्पाची नियमावली सांगितली. दीनदयाल अनोखे दुकानामध्ये आपण सर्वांनी उपयोगातील, व्यवस्थित सामान घ्यावयाचे असल्याने येथे फाटक्या वस्तू, निरुपयोगी उपकरणे वस्तू कुणीही देऊ नये, असे सांगितले.
श्रीपाद अपराजित म्हणाले, दातृत्व म्हणजेच मातृत्व आहे. दातृत्ववान व्यक्ती म्हणून आपण मुंबई, दिल्ली किंवा परदेशातील लोकांकडे पाहण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचा आदर्श घ्यावा. संदीप जोशी असेच व्यक्तिमत्व असून हाती घेतलेले समाजोपयोगी कार्य ते हमखास पूर्ण करतात. दीनदयाल अनोखे दुकान हे प्रकल्प अविरत सुरू राहावे यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपले पूर्ण योगदान देऊ, असे आश्वस्त त्यांनी केले. गजानन जानभोर यांनीही संदीप जोशी यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. समाजातील नागरिकांनी प्रकल्पाचे दातृत्व स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रफुल्ल माटेगावकर व सायली यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन रेणूका देशकर यांनी केले.