नागपूर; वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आला होता. याप्रकरणी राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने एका तरुणाला आसाममधून अटक केल्याचे वृत्त आहे. त्याला मुंबईत आणून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे.
या तरुणाने १६ ऑगस्ट रोजी बीसीसीआयच्या अधिकृत ई-मेल अकाउंटवर एक मेल पाठवला होता. यामध्ये भारतीय संघावर हल्ला होणार असल्याचा मजकूर होता. यानंतर कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजमध्ये गेलेल्या संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
भारतीय संघाला देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने हा ई-मेल कुठून आला, हे शोधल्यानंतर आसाममधील जगी रोड पोलिसांच्या मदतीने मंगळवारी या तरुणाला अटक करण्यात आले. ब्रजमोहन दास असे या तरुणाचे नाव असून हा ई-मेल खोटा असल्याचे आणि खोडसाळपणा करण्यासाठी पाठवला असल्याचे त्याने स्पष्ट केले. या तरुणाकडची सर्व इलेक्ट्रॉनिक साधनेही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, या तरुणाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.