नागपूर : कविवर्य सुरेश भट यांनी कवितांचे विविध प्रकार हाताळले. परंतु त्यांनी मराठीमध्ये गझल प्रकारात रसिकांमध्ये गोडी निर्माण केली व वेगळा आयाम दिला, असे प्रतिपादन म.न.पा.चे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कविवर्य सुरेश भट यांच्या ८७ व्या जन्मदिनानिमित्त रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहातील अर्ध पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती नागेश सहारे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश सहारे यांनी कविवर्य सुरेश भटांच्या साध्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करुन त्यांनी बुध्द धम्माचा व कविता साहित्याचा प्रचार केल्याचा आवर्जून उल्लेख केला. म.न.पा.ने त्यांच्या नावाने सभागृह बांधल्यामुळे नागपूरच्या वैभवात भर पडली, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कविवर्य सुरेश भटांच्या ‘प्रेम’ या कवितेचे वाचन केले.
यावेळी शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, विलास चिंतलवार यांच्यासह सभागृहातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. आभार सभागृहाचे व्यवस्थापक प्रदीपकुमार तुंबडे यांनी मानले.
अधिक वाचा : कविवर्य सुरेश भट सभागृहाला उत्कृष्ट वास्तुकलेचा पुरस्कार