नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी संचालित बेघर निवारा केंद्रातील लोकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.
नागपूर शहराच्या फुटपाथवरील बेघर, निराधारांना निवाऱ्याची चांगली सोय उपलब्ध होवून, त्यांचं जगणं सुसह्य व्हावं, यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत नागपूर महानगरपालिका, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शहरी बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात शहराच्या फुटपाथवरील बेघरांना निवारा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे. कलर्स ऑफ बेनेटन (UCB Brand), क्लॉथ बॉक्स फाऊंडेशन नागपूर यांनी सामाजिक उपक्रमात सहभाग (सीएसआर) या योजनेंतर्गत नागपूर शहरातील निराधार बेघरांना नि:शुल्क कपडे वाटप करण्यास्तव बेघरांसाठी कार्यरत असलेल्या सह्याद्री संस्थेसोबत समन्वय करार केलेला आहे.
मंगळवारी (ता. १९) होळीच्या पूर्वसंध्येला शहरी बेघर निवारा, सीताबर्डी नागपूर येथे बेघर नागरिकांना कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ब्रँडेड नवीन कपडे मिळाल्याने यावेळी बेघरांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. त्यांच्या चेहर्यावरील द्विगुणित झालेले हास्य, आनंद पाहून उपस्थित सर्वांना सुखद समाधान मिळाले.
याप्रसंगी बेघर नागरिकांसह समाजभान जपणारे देवेन्द्रकुमार क्षीरसागर, भारत गजभिये, दीपक पसारकर, महेश येडे यांचेसह USB कंपनी तसेच निवारागृहाचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.
अधिक वाचा : 20 को जागनाथ रोड की ओर से सभी सदस्यों के लिए होली मिलन