नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्मार्ट इंडीया हॅकेथॉन 2019 च्या महाअंतिम फेरीचे स्थानिक किंग्सवे स्थित जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात 2 ते 3 मार्च दरम्यान आयोजन होणार आहे. 2 मार्च शनिवार रोजी सकाळी 7.30 वाजता महाअंतिम फेरीच्या उद्घाटनाप्रसंगी व्हि.एन.आय. टी. चे संचालक डॉ. पी.एम. पडोळे प्रमुख अतिथी व एंजेल इन्वेस्टरचे संचालक शशिकांत चौधरी , रायसोनी समुहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी व जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रीती बजाज प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
डिजिटलायजेशनला चालना देण्यासाठी व संशोधन व उद्यमशिलतेच्या माध्यमातून प्रशासन सुलभ व सोयीस्कर व्हावे यासाठी स्मार्ट इंडीया हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचे अखिल भारतीय स्तरावर 2 मार्च रोजी उद्घाटन होणार असून व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे व उपाध्यक्ष आनंद देशपांडे सुद्धा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे विद्यार्थ्याना संबोधित करतील.
स्मार्ट इंडीया हॅकेथॉन ही 36 तास सलग चालणारी एक सॉफ़्टवेअर प्रॉडक्ट डेवलपमेंट स्पर्धा असून विविध शासकीय विभागांना येणा-या तांत्रिक समस्यांबाबत (प्रॉब्लेम स्टेटमेंट) विद्यार्थी सॉफ़्टवेअरनिर्मितीद्वारे समाधान शोधणार आहेत. 2019 हे स्पर्धेचे दुसरे वर्ष असून देशभरातील 48 नोडल केंद्रांपैकी जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे एक केंद्र आहे. जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणा-या स्पर्धेत 28 चमू व त 168 विद्यार्थी सहभागी होणार असून यात 60 मुलींचा समावेश आहे. देशभरात सुमारे 3 हजार महाविद्यालयात होणा-या स्पर्धेत लाखाभरापेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत. रायसोनी महाविद्यालयाला गोवा शिपयार्ड लिमिटेड, प्रिसाईज कॅलिबरेशन प्रा.लि., एम.एस.एम.ई. अशा संस्थानी 7 प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले असून त्यांवर समाधान शोधण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर असणार आहे.
या स्पर्धेचा समारोप 3 मार्च रोजी होणार असून याप्रसंगी पी.डब्लू.सी. इंडीया चे सहयोगी संचालक चिंतक सुतारिया, टेक महिंद्रा नागपूरचे केंद्रप्रमुख मनिष अग्रवाल व एम.एस.एम.ई.-डी.आय. नागपूरचे संचालक श्री. पी.एम. पार्लेवार उपस्थित राहणार आहेत.
अधिक वाचा : बदल घडविण्यासाठी ‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’ फायदेशीर