नागपूर : तीन वर्षे प्रेमसंबंध ठेवल्यानंतर प्रेयसीने अचानक लग्नास नकार दिल्याचे दुःख न पचवू शकलेल्या प्रियकराने रागाच्या भरात रस्त्यात जे दिसले त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास पाचपावलीत उघडकीस आली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९, रा. पाचपावली) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली.
सोमेश हा बेरोजगार असून तो दारुडा आहे. तो दोन वर्षांपूर्वी गणेशपेठमधील प्रेरणा कॉलेजमध्ये शिकत असताना त्याच्याच वर्गात अश्विनी (बदललेले नाव) हिच्याशी ओळख झाली होती. दोघांचे मैत्रीनंतर प्रेम प्रकरण फुलले. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. दोघांचे प्रेमसंबंध दोन वर्षांपर्यंत सुरू होते.
बारावी झाल्यानंतर दोघांनीही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. तर अश्विनीची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे तिने एका कूलर कंपनीत नोकरी स्वीकारली. तर सोमेश हा बेरोजगार म्हणून फिरत आहे. त्याला दारूचे व्यसन जडले. त्यातच त्याने अश्विनीला लग्नाची गळ घातली. त्यामुळे अवघ्या १९ व्या वयात बेरोजगार असलेला सोमेशला भविष्याचा विचार करून तिने नकार दिला. गेल्या काही महिन्यांपासून ती त्याला टाळत होती.
परंतु, सोमेश तिचा पाठलाग करून तिला लग्नासाठी तगादा लावत होता. सोमवारी रात्री नऊ वाजता त्याने अश्विनीला लग्नाबाबत विचारले असता तिने पुन्हा नकार दिला. प्रेमास नकार पचवता न आल्याने त्याने चिडून खिशातील चाकू काढून रस्त्याने दिसेल त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये राजू गोविंदराव नंदनवार (तांडापेठ, जुनी वस्ती), जितेंद्र गुलाबराव मोहाडीकर (४२), रमेश श्रावण निखारे (५०), प्रतीश सुरेंद्र खापरे (वय १५) आणि मोहम्मद शेख अन्सारी मोहम्मद खाजम मरहूम (वय ३५) यांच्यावर चाकूहल्ला केला. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाचपावली पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक केली.
अधिक वाचा : दोन युवकांवर जीवघेणा हल्ला, अंबाझरीतील खळबळजनक घटना