मुंबई – नागराज मंजुळेचा पहिला बॉलिवूड चित्रपट झुंड अनेक कारणांनी चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात सैराट फेम रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २० सप्टेंबर २०१९ रोजी झुंड प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
झुंड चित्रपटाची कथा स्लम फुटबॉल लिगची आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलचे धडे शिकवत त्यांना व्यसनापासून बाजूला नेणाऱ्या एका कर्तृत्ववान कोचची आहे. विजय बारसे यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेली ही कथा आहे. ही मध्यवर्ती भूमिका अमिताभ बच्चन साकारत आहेत.
या चित्रपटातील इतर कलाकार हे खरोखर झोपडपट्टीत राहणारे फुटबॉल खेळाडू आहेत. सैराट फेम आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरुचीदेखील यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
नागराज मंजुळे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. अमिताभसोबत काम करण्याचे त्यांचे स्वप्न होते. झुंडच्या माध्यमातून ते आता पूर्ण होतंय. झुंडच्या टीझर आणि ट्रेलरची आता प्रेक्षकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.