नागपूर : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत नागपूर महानगरपालिकेत सुरू असलेल्या इक्वीसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षण विभागाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत इक्वी सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित विविध शाळांमध्ये स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यात आले. प्रत्येक शाळांमध्ये प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये स्वच्छतेवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नंतर स्वच्छता जनजागृती रॅली काढली.
शाळेलगत असलेल्या वस्त्यांमध्ये फिरून त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. रॅलीदरम्यान एका कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण स्वच्छता, कचरा विलगीकरण आदी बाबत चित्रफीत दाखविण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमात जयताळा मराठी माध्यमिक शाळा (झोन क्र. १), वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा (झोन क्र. २), दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळा (झोन क्र.३), बॅ. शेषराव वानखेडे माध्यमिक शाळा (झोन क्र.४), दत्तात्रय माध्यमिक शाळा (झोन क्र.५), गंजीपेठ उर्दु माध्यमिक शाळा (झोन क्र.६), कुंदनलाल गुप्ता उर्दु माध्यमिक शाळा (झोन क्र.७), डॉ. राममनोहर लोहीया माध्यमिक शाळा (झोन क्र.८), कपिलनगर मराठी माध्यमिक शाळा (झोन क्र.९), मकरधोकडा हिंदी माध्यमिक शाळा (झोन क्र.१०) या शाळांनी सहभाग नोंदविला. विविध उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ५० हजार लोकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविणे आणि त्यांना जागरुक करणे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. इक्वीसिटीच्या चमूने शहरातील निवासी भागात तसेच शाळा व व्यावसायिक प्रतिष्ठांनांना भेटी देऊन तेथे स्वच्छताविषयक जनजागृती केली. यादरम्यान सुमारे ७०० नागरिकांनी परिसर स्वच्छतेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या. संपूर्ण उपक्रमासाठी इक्वी सिटीच्या चमूसह शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले.
अधिक वाचा : पलक अग्रवाल ने दी अरंगेत्रम की प्रस्तुति