नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या सीमेंट रस्ता टप्पा २ मधील अखेरचे पॅकेज वगळता इतर सर्व कामे १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्यात यावी. जी रस्ते पूर्ण झाली आहेत त्या रस्त्यावरील लहानसहान कामे पूर्ण करण्यात यावे. रस्त्यावर पडलेले आय-ब्लॉक्स उचलण्यात यावे. रस्त्यावरील धूळ स्वच्छ करण्यात यावी. डिवायडरची रंगरंगोटी आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश प्रस्तावित व अपूर्ण असलेल्या बी.ओ.टी, पी.पी.पी., केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.
सदर समितीची बैठक बुधवारी (ता. ६) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला सत्तापक्ष नेते तथा समिती सदस्य संदीप जोशी, आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मोती कुकरेजा, सतीश नेरळ, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे उपस्थित होते.
अजनी स्टेशन पूल आणि वर्धा रस्त्याला जोडणाऱ्या डी.पी. रस्त्याचे लोकार्पण २२ फेब्रुवारी रोजी निश्चित झाले आहे. त्यादृष्टीने रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी जाणून घेतली. उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीसाथ, तीन नल चौक, बुधवारी येथील मटन मार्केटच्या सद्यस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. त्याचेही लोकार्पण २२ फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आले असून त्यादृष्टीने तयारी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यानंतर समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट, घनकचरा व्यवस्थापन, महाल बुधवार बाजार, सक्करदरा बुधवार बाजार, कमाल टॉकीजजवळील बाजार, महाल येथील मासोळी बाजार, केळीबाग रोड, गड्डीगोदाम येथील रस्ता, पारडी येथील रस्त्यासंदर्भातील कार्यवाहीची सद्यस्थिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. पुढील बैठकीत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नाग नदी प्रकल्पासाठी जिकाने अर्थसहाय्य देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्याबाबतचा सुधारीत प्रस्ताव सादर लवकरच सादर करण्यात येईल, अशी माहिती तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल यांनी दिली. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन आतापासून करण्याचे निर्देशही श्री. दटके यांनी दिले. नाईक तलाव, सोनेगाव तलाव, गांधीसागरचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.
शहरात लागणाऱ्या एलईडी लाईट प्रकल्पाची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. मे २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करावयाचा असून त्यानुसार महिनानिहाय अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. स्मार्ट सिटी प्रकल्पातील काही प्रश्नांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली आणि आवश्यक ते निर्देश दिले.
शहरातील कचऱ्याची उचल करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदांमध्ये अनुभवी आरोग्य निरीक्षकांची मते घेण्यात यावीत. त्यांच्या अनुभवाच्या आधारे स्कोप ऑफ वर्क मध्ये आवश्यक ते फेरबदल करण्यात यावे. निविदेची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त, आरोग्य निरिक्षक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : लक्ष्मी नगर झोनमध्ये ‘महापौर आपल्या दारी’