नागपूर : राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामाला आता सुरुवात झाली असून ९० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली. येत्या ३० महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदारांना देण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यातून जाणार २८ किलोमीटरचा रस्ता
नागपूर विभागातील नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील ५५ गावांमधून हा महामार्ग जात आहे. ८९.४३ किलोमीटरच्या मार्गासाठी १ हजार ४३ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून जाणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत २१ गावांतील २८.४२ किलोमीटर लांबी राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १३ जुलै २०१७ रोजी हिंगणा तहसीलमधून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. नागपूर जिल्ह्यात खासगी व सरकारी जमीन मिळून ३१६.३६ हेक्टर आर जमिनीची आवश्यकता असून यापैकी ३०१.९४ हेक्टर आर जमीन (९५.४४ टक्के) ताब्यात घेण्यात आली आहे.
जिल्ह्यातील २० गावातून जाणार महामार्ग
समृद्धी महामार्ग नागपूर जिल्ह्याच्या २० गावामधून जाणार आहे. त्यासाठी ९० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. यात शेतकऱ्यांना ५ पट पैसे देऊन त्यांच्या मर्जीनुसार जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी जमिनी विकल्यानंतरही त्यांच्या जमिनीवरील पिके वाया जाऊ नयेत यासाठी पीक निघेपर्यंत शासनाने त्यांनी मुभा दिली, अशी माहिती हिंगणाचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी दिली.
मिहानच्या मागील बाजूने महामार्गाचा शुभारंभ
हिंगणा तालुक्यातील शिवमडला हे समृद्धी महामार्गाचा झिरो पॉईंट राहणार असून येथून समृद्धी महामार्गाला सुरुवात होणार आहे. हा भाग मिहानच्या मागील असून येथून मिहान, हिंगणा तालुका, अमरावती येथील वाहने या मार्गावर प्रवेश करू शकतील.
अधिक वाचा : गांधीबागमध्ये हायड्रोलिक कचरा टबाचे उद्घाटन