नागपूर : आज आपल्या नागपूर शहरामध्ये अनेक विकास कामे सुरू आहेत. शहरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. सर्वत्र सिमेंटचे रस्ते तयार होत आहेत. कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या रूपात देशपातळीवरील सुंदर सभागृह आपल्याकडे आहे. याशिवाय शहरात स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे मोठे स्टेडियम, सिम्बॉयसिस सारख्या मोठ्या शिक्षण संस्था येत आहे. आयआयएममुळे शहर शिक्षण आणि आरोग्य हब म्हणून पुढे येत आहे.
ई-रिक्षाने अनेकांना आत्मविश्वासाने जगण्याचे बळ दिले. यामध्ये भर घालत सांडपाण्यातून विज निर्मितीचा पथदर्शी प्रयोग आपल्याच नागपुरात सुरू आहे. ही सर्व कामे आज जगामध्ये नागपूरचे नाव उंचावत आहे. एकेकाळी जगात उल्लेखही न होत असलेले नागपूर लवकरच ‘ग्लोबल सिटी’ म्हणून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविणार आहे, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता.२६) नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती लहुकुमार बेहते, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, नितीन कापडनीस उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आज देश परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना, स्मार्ट सिटी व सर्वांना घरे या उद्दीष्टांसह देशाचा विकास झपाट्याने होत आहे. या सर्व योजनांच्या यशस्वीतेसाठी नागपूर महानगरपालिका सदैव कार्यरत आहे. दुस-या टप्प्यामध्ये नागपूर शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली. दुस-या टप्प्यात निवड होउनही आज आपले नागपूर शहर देशातील १०० स्मार्ट सिटीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने शहरात सर्वत्र विकासाची कामे होत आहेत. मात्र ही विकासाची गंगा जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत शाश्वत विकासाची संकल्पनाच पूर्ण होऊ शकणार नाही. लोकप्रतिनीधी, प्रशासन यांच्याकडून यासाठी प्रयत्न होत आहेत मात्र यासाठी लोकांनीही यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यासाठी ‘मेयर इनोव्हेशन अवार्ड’च्या माध्यमातून शहरातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शहराच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळणार आहे. ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमामुळे जनतेचा लोकप्रतिनिधींसह प्रशासनाशी थेट संपर्क येत असल्याने या संवादतून कामाला गती मिळत आहे. विकासाची गती पुढेही वाढत राहावे यासाठी जनसहभाग मिळविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अग्निशमन पथकाचे महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे व आयुक्त अभिजीत बांगर यांनी निरीक्षण केले. त्यानंतर परेडची मानवंदना स्वीकारली. कार्यक्रमाचे संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. यावेळी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, निगम सचिव हरीश दुबे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, सहायक आयुक्त मिलींद मेश्राम यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले.
मतदार यादीत नाव नोंदवा, लोकशाही बळकट करा
भारतीय प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्यातून मतदानात भाग घेणे आवश्यक आहे. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान लोकशाही पंधरवाडा साजरा केला जात आहे. मतदान हा प्रत्येकाचा हक्क असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व तरुण-तरुणींनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आत्मविश्वासाने पुढे येत आहेत. भारतीय संविधानाने मुळातच महिलांना सक्षम बनविले आहे फक्त महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. देशासाठी मजबूत पिढी निर्माण करण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये आहे. यासोबत सक्षम राष्ट्र घडविण्याचेही सामर्थ्य महिलांच्या मनगटात आहे, यासाठी महिलांनी प्रत्येक क्षेत्राप्रमाणेच लोकशाहीच्या बळकटीकरणासाठीही पुढे यावे व मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
कर्तव्यदक्ष अग्शिमन अधिकारी-कर्मचा-यांचा गौरव
शहरात विविध ठिकाणी झालेल्या आगीच्या दुर्घटनेतून नागरिकांना सुखरूप बाहेर काढून जीव वाचविणारे सीताबर्डी पोलिस स्टेशनचे हेमंतकुमार खराबे यांच्यासह मनपाचे कर्तव्यदक्ष अग्निशमन अधिकारी व कर्मचा-यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नरेंद्र नगरचे अग्निशमन केंद्र अधिकारी डी.एन. नाकोड, लकडगंजचे सहायक अग्निशमन अधिकारी राजु सिरकीवार, लकडगंजचे प्रमुख अग्निशमन विमोचक सुरेश आत्राम, यंत्र चालक अशोक घवघवे, अग्शिमन विमोचक मकरंद सातपुते, अग्निशमन विमोचक रवींद्र मरसकोल्हे, अग्निशमन विमोचक शालिक कोठे, ऐवजदार कर्मचारी मनोज गोरे, विभागीय यंत्र चालक कर्मचारी शेख अकलीम यांच्यासह कर्तव्य भावनेतून कार्य करणारे नागरिक अजय टक्कामोरे यांनाही महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महापौरांनी दिली ‘कुष्ठरोग मुक्त भारत’ची शपथ
भारत सरकारच्या प्रगती पोर्टलमध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला असून त्या अंतर्गत समाजातील कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात सर्वत्र विविध अभियान राबविण्यात येत आहे. ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी उपस्थितांना ‘कुष्ठरोग मुक्त भारत’ची शपथ दिली.
अधिक वाचा : अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन : ५० हजारांवर रुग्णांनी घेतला लाभ