नागपूर : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात येणाऱ्या लोकशाही पंधरवाड्यानिमित्त सक्करदरा येथील सेवादल महिला महाविद्यालय आणि विदर्भ बुनियादी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
नागपूर महानगरपालिका आणि निर्भया बेटी सुरक्षा अभियानाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य दादाजी कारेमोरे होते. यावेळी निर्भया बेटी सुरक्षा अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय कटकमवार, कमलदीपसिंग कोचर, अण्णाजी बरगट प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी लोकशाही पंधरवाड्यानिमित्त १५ दिवस नागपूर शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती संजय कटकमवार यांनी दिली.
उपायुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्या मार्गदर्शनात लोकशाही पंधरवाडानिमित्त ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाले आहे त्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी आणि मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे यांनीही लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन केले. अन्य मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयात सेल्फी कॉर्नर उभारण्यात आला होता. यासमोर विद्यार्थ्यांनी छायाचित्र काढून मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन नागरिकांना केले.
अधिक वाचा : लोकशाही पंधरवाडानिमित्त मतदार नोंदणी जनजागृतीचे कार्यक्रम